‘सेक्युलर’ शब्द डॉ. आंबेडकरांचाच

0

हडपसर । भारतीय राज्यघटनेतला ‘सेक्युलर’ हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाच असून तो 26 जानेवारी, 1950पासूनच घटनेत आहे. तोच 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने सरनाम्यात आणला गेला. तेव्हा तो घटनेत आधी नव्हता आणि नंतर तो शब्द आणला गेला, ही माहिती निराधार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांनी केले.

महादेवनगर येथील हिरामण ससाणे समता प्रतिष्ठान संचलित, ज्ञानज्योती वाचनालयाचे उद्घाटनप्रसंगी अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘भारतीय संविधानापुढील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. प्रा. सुभाष वारे, उज्ज्वला टिळेकर, प्रल्हाद आबनावे, दत्ता भंडार, राजेंद्र शिंदे, सुरेश घुले, दत्तोबा ससाणे, जयसिंग गोंधळे, सुरेश वैराळकर, बाळासाहेब हिंगणे, वसंत नवले, कल्पना राऊत, शिवाजी पवार, हरिभाऊ काळे, विठ्ठल ढोरे, रजतनाना काळे, शिवराज घुले, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. नाना झगडे, डॉ. नामदेव भुजबळ, प्रा. उल्हास लंगोटे आदी उपस्थित होते.

सामाजिक समता, न्याय, बंधुता यांसह सामान्य नागरिक हाच राज्यघटनेचा केंद्रबिंदू डॉ. आंबेडकरांनी मानला. भारतीय जातिव्यवस्थेचे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य हे लाभार्थी आहेत. शूद्र, अतिशूद्र आणि सर्व स्त्रिया या व्यवस्थेच्या बळी आहेत. सध्याच्या सरकारने नियोजन आयोग मोडीत काढून दलित-आदिवासींच्या कल्याणकारी योजनेत केलेली प्रचंड कपात ही शुद्ध फसवणूक आहे. आजचे राजकारण संक्रमणावस्थेतून जात आहे. सरकारचे सगळे निर्णय हे नागपूर येथून ठरत आहेत. त्यामुळे बहुजन समाजातील विचारवंत जागृत झाले नाही तर राज्यघटना मोडीत निघेल. आणि 2019ची निवडणूकही शेवटची असेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. प्रा. सुभाष वारे म्हणाले, भारताचे संविधान हे सर्वांना न्याय देणारे असून यातील विविध तरतुदींची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाल्यास देशासमोरच्या अनेक गुंतागुंतीच्या समस्या सहज सुटतील.प्रास्ताविक दत्ता भंडार यांनी केले. सूत्रसंचालन रघुनाथ ससाणे यांनी केले. आभार उज्ज्वला टिळेकर यांनी मानले.