सेक्युलॅरिझमबाबत वेगळी चर्चा करण्याची गरज नाही : संजय राऊत

0

नवी दिल्ली : सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेने राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षासोबत जवळीक वाढवली असून, सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे. कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेली शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सेक्युलर विचारांच्या पक्षांसोबत कसे काय जुळवून घेणार? हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावर आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत सेक्युलॅरिझमबाबत विचारणा झाली असता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. सेक्युलर हा शब्द घटनेमध्येच आहे. येथील राज्यकारभार त्याच पद्धतीने चालतो. कुणाचेहा काम करताना जात धर्म पाहिले जात नाही, त्यामुळे त्याबाबत वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सेक्युलॅरिझमूबाब बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, आपल्या देशाच्या घटनेमध्ये सेक्युलर हा शब्द समाविष्ट आहे. आपली घटना सेक्युलर या शब्दावर आधारित आहे. येथे जात धर्म पाहून काम केले जात नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीसुद्धा न्यायालयामध्ये कुठल्याही धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेण्यास लावण्याऐवजी संविधानावर हात ठेवून शपथ घेण्यास लावावी, असा विचार मांडला होता. त्यामुळे सेक्युलर या शब्दावर अधिक काही बोलले पाहिजे, असे मला वाटत नाही.

दरम्यान, राज्यातील सरकार स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले की, सरकार स्थापन करण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काही निर्णय घेतले आहेत. त्यांचे माझ्याशी बोलणे झाले आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीसुद्धा फोनवरून चर्चा झाली आहे.