पुणे । सहायक प्राध्यापकपदासाठी अनिवार्य असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून हा निकाल अवघा 3.92 टक्के लागला आहे. यासाठीची परीक्षा 16 एप्रिल रोजी घेण्यात आली असून तब्बल पाच महिन्यांतर सेटचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसाठी 16 एप्रिल रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी 2 वाजल्यानंतर जाहीर करण्यात आला. या परीक्षेस एकूण 69 हजार 186 विद्यार्थी पात्र झाले होते. त्यांपैकी 2 हजार 710 विद्यार्थी सहायक प्राध्यापक म्हणून पात्र ठरले आहेत. विद्यार्थ्यांना या अंतिम निकालाबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी पाच हजार रुपयांच्या डिमांड ड्राफ्टसह संकेतस्थळावरील अर्ज एका महिन्याच्या आत भरुन द्यायचा आहे. तसेच आक्षेपाचे पुरावेही सोबत जोडावयाचे आहेत.
पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रमाणपत्र एक महिन्याच्या आत मिळेल. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पदव्युत्तर परीक्षेचे निकालपत्र जोडले नाही त्यांना ते निकालपत्र जोडल्यानंतर सेट परीक्षेचे प्रमाणपत्र मिळेल असे सेट विभागाचे सचिव डॉ.अरविंद शाळीग्राम यांनी सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने उत्तरसूचीवर आक्षेप मागविले होते. त्यानुसार एकूण 116 विद्यार्थ्यांनी हरकतीसाठी अर्ज केले आहेत. त्यातील 20 विषयावरील एकूण 172 प्रश्नांवर विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यानुसार निकाल जाहीर केला गेला आहे.