संगनमताने हुंड्याची तक्रार मागे घेतल्याने न्यायालयाचा संताप
मुंबई । सेटलमेंट करुन हुंड्याची तक्रार मागे घेणार्या घटस्फोटित दाम्पत्यालाच मुंबई हायकोर्टाने दंड ठोठावला आहे. पतीला २० हजार तर पत्नीला १० हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. मुंबईतील कांदिवली भागात राहणार्या तरुणाविरोधात त्याच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार केली होती. मात्र दोघांनी सेटलमेंट करुन हे प्रकरण निकाली काढलं. सेटलमेंटसारख्या वैयक्तिक प्रकरणांमध्ये पोलिस आणि कोर्टाची मशिनरी वापरली जाते. आतापर्यंत कोर्टाने पतीकडून दंड वसूल केला आहे. यावेळी मात्र कोर्टाने पतीसोबतच पत्नीलाही दंड सुनावला.
दंडाची रक्कम नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंडला
मुंबईच्या वरळीतील नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंडला दंडाची रक्कम देण्यास कोर्टाने सांगितले आहे. पत्नीला घटस्फोट देण्याची तयारी दर्शवल्यानंतर तिने आपल्याविरुद्ध आणि कुटुंबीयांविरुद्ध केलेल्या सर्व फौजदारी कारवाया मागे घेण्याचे आश्वासन दिले, असे पतीने कोर्टात सांगितले. २०१३ मध्ये कांदिवली पोलिसात तरुणीने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात एफआयआर दाखल केला होता. हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी तरुणाविरोधात कलम ४९८अ अन्वये गुन्हा दाखल झाला. २०१६ मध्ये तरुणीने वांद्र्याच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली. जून महिन्यात कोर्टाने त्यांना विवाह सल्लागाराकडे पाठवले. हिंदू मॅरेज अॅक्टच्या १३ब नुसार दाम्पत्याने परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.