सेटिंग टीईटी नंतर गुरुजी झालेल्यांच्या भवितव्यावरही प्रश्न चिन्ह ?
महाराष्ट्रात महाघोटाला उघडकीस येण्याची शक्यता..
जनशक्ति नंदुरबार | रवींद्र चव्हाण | राज्य परीक्षा मंडळाचे आयुक्त तुकाराम सुपे यांना टी. ई. टी. पेपर घोटाळा प्रकरणात अटक झाल्यानंतर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे यापूर्वी टीईटी ची सेटिंग परीक्षा देऊन नोकरी मिळवलेल्या गुरुजींच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या साऱ्या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी झाल्यास महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील महाघोटाळा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केले जात आहे.
राज्यात दिनांक 21 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे यांच्या वतीने शिक्षक पात्रता ( टीईटी ) परीक्षा घेण्यात आली होती. नंदुरबार शहरातील केंद्रांवर सुमारे दहा हजाराहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे . मात्र टीईटी पेपरचा घोटाळा बाहेर आल्याने या परीक्षेवरच प्रश्न चिन्हे उपस्थित केले जात आहेत. टी.ई.टी. परीक्षा पास होण्यासाठी अनेक उमेदवारांनी एजंटांना मोठी रक्कम दिल्याचे एक एक किस्से उघड होत आहे. त्याचा धागा पकडून परीक्षा मंडळाचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे जिल्ह्यात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या एजंटांचे धाबे दणाणले आहेत. जो उमेदवार पैसा देतो त्याला टीईटीचे पेपर कोरा ठेवण्यास सांगितले जाते, त्या कोर्या पेपरावर उत्तर भरून गुणदान देण्याची शाळा नंतर भरवण्यात येते. असा हा टी.ई.टी. परीक्षेचा खेळ गेल्या चार पाच वर्षापासून सुरू असल्याची चर्चा आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच डी.एड. किंवा बी.एड. शैक्षणिक अहर्ता धारक उमेदवार शिक्षक बनण्यास पात्र ठरतात. परंतु ही परीक्षा पास होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे ज्यांची शिक्षक बनण्याची पात्रता नाही असे उमेदवार वाम मार्गाचा वापर करत असल्याचे आता उघड होऊ लागले आहे. दरम्यान या परीक्षेचे मुख्य सूत्रधार आयुक्त तुकाराम सुपे यांच्या अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर्षीचा पेपर फुटला म्हणून हा घोटाळा समोर आला आहे. मात्र याआधी गेल्या तीन-चार वर्षांपासून सेटींग परीक्षा देऊन ज्यांनी नोकर्या मिळवल्या आहेत, गुरुजी बनवून अध्ययन करीत आहेत, त्यांचं काय ? त्यांच्यावर शासनाचे आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे, त्या नुकसानीचे काय ? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. यापूर्वी टी.ई.टी. परीक्षा देऊन जे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत, त्यांच्या पेपरांची फेरतपासणी झाल्यास किंवा हस्ताक्षर तज्ञांची मदत घेतल्यास टी.ई.टी. परीक्षेचा महाघोटाळा उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टी.ई.टी. परीक्षा घोटाळा हे प्रकरण शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे असून जर अशा पद्धतीने गुरुजी देण्याची सिस्टीम महाराष्ट्र चालत असेल तर भावी पिढीच्या भवितव्य अंधारमय असण्याची भीती जनमानसात व्यक्त केली जात आहे