सेतू कक्ष तहसील कार्यालयात

0

भुसावळ। शहरातील जुन्या तहसील कार्यालयात सुरू असलेल्या सेतू सुविधा कक्षाचे जळगाव रोडवरील नवीन तहसील कार्यालयात सोमवारी स्थलांतर होवून नवीन कक्षात त्याची सुरुवातही झाली. आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते नवीन कक्षाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. ऑनलाईन दाखल्यांमुळे कामकाजात पारदर्शकता येणार असून जनतेला त्यामुळे दिलासा मिळणार असल्याचे मत आमदार सावकारे यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. ते म्हणाले की, शासनाने अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. यापूर्वी संगणकीकरणात भुसावळ तालुका मागे होता मात्र तत्कालीन तहसीलदारांसह सर्व कर्मचार्‍यांनी यशस्वीपणे काम पूर्ण करून 95 टक्क्यांवर सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण केले आहे. ऑनलाईन अर्ज कशा पद्धत्तीने करावेत याबाबत प्रसिद्धी माध्यमांनी जनजागृती करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तहसीलमधील मध्यस्थांचा सुळसुळाट थांबणार
प्रास्ताविकात नायब तहसीलदार ज्ञानेश्‍वर सपकाळे म्हणाले की, अर्जदारांसोबत सेतू कक्षात येणार्‍या मध्यस्थांचा सुळसुळाट आता थांबणार आहे. अर्जदारांना तातडीने दाखले मिळण्यास आता मदत होईल. व्यासपीठावर प्रभारी तहसीलदार संजय तायडे, सेतू कक्षाचे व्यवस्थापक नीलेश कोलते उपस्थित होते. आभार नारायण महिरे यांनी मानले. कार्यक्रमास अनिल इंगळे, मुन्ना सोनवणे, संजय खडसे, सुनील ठाकूर यांच्यासह सेतू कक्षाचे विवेक चौधरी, सुहास पाटील, हरीष ससाणे, सनी मेश्राम, किशोर पांडव, अमोल पाटील आदींची उपस्थिती होती.

डिजिटल दाखले
सेतू सुविधा कक्षात नागरिकांना नेहमीप्रमाणेच उत्पन्न, क्रिमीलेअर, जातीचे, रहिवास तसेच रेशनकार्डातून नावे कमी करण्यासाठी लागणारे दाखले दिले जाणार आहेत. त्यासाठी संबंधित कागदपत्रांसह प्रकरण सादर केल्यानंतर दोन दिवसांनी लागलीच दाखले दिले जातील. विशेष म्हणजे यापूर्वी तहसीलदारांच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित राहणार्‍या दाखल्यांवर आता अधिकार्‍यांची डिजिटल स्वाक्षरी राहणार असल्याने कामकाजात सुसूत्रता येणार आहे. जात प्रमाणपत्रासह नॉन क्रिमीलेअर दाखल्यांचे मात्र प्रांताधिकार्‍यांच्या म्यॅनुअली स्वाक्षरीनेच दिले जाणार आहेत.

बायोमेट्रीक थंबने काम
सेतू सुविधा कक्षातून मिळणार्‍या विविध कागदपत्रांचा गठ्ठा सेतू कर्मचार्‍यांना अधिकार्‍यांपुढे यापूर्वी न्यावा लागत होता मात्र आता सेतू कक्षातच कागदपत्रे स्कॅन केली जाणार असून तहसीलदार संपूर्ण प्रकरण ऑनलाईन तपासणार असून त्यांची शहानिशा झाल्यानंतर बायोमेट्रीक थम्बने दाखल्यांना मंजुरी देणार आहेत. अवघ्या पाच मिनिटात दोन ते पाच हजार दाखल्यांना थम्ब लागल्यानंतर सेतू सुविधा कक्षातील कर्मचार्‍यांचाही ताण कमी होणार आहे. सेतू कक्षात कागदपत्रे स्कॅन झाल्यानंतर प्रकरण कारकून, अव्वल कारकून यांनी तपासल्यानंतर तहसीलदारांकडे मंजुरीसाठी जाईल.