भुसावळ : दहावी, बारावीचा निकाल लवकरच लागणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने व्यावसायीक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश दिला गेला आहे. तंत्र निकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिये दरम्यान विविध दाखले, प्रमाणपत्रांची गरज भासते परंतु भुसावळात सेतू सुविधा केंद्रात ह्या सुविधा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना दाखले वेळेत मिळण्यासाठी भुसावळ शिवसेनेचे तालुका संघटक प्रा.धीरज पाटील यांनी भुसावळ उपविभागीय अधिकारी रामचंद्र सुलाने यांच्याकडे मागणी केली आहे.
विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार : प्रा.धीरज पाटील
भुसावळ तालुक्यात सेतू सुविधा केंद्रावर गर्दी होत असते कारण व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. काही वेळा सर्व्हर डाउनच्या समस्यांना नागरीकांना सामोरे जावे लागत आहे. प्रमाणपत्र सादर करण्यात विलंब झाल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश अडचणीत येण्याची शक्यता असते त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याआधीच आवश्यक ती कागदपत्रे काढण्यासाठी त्वरीत ह्या सर्व दाखल्यांच्या सुविधा सोशल डिस्टन्सचे पालन करीत सुरू कराव्यात त्यामुळे उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार असल्याचा आशावाद प्रा.धीरज पाटील यांनी व्यक्त केला आहे.
वेळेत द्यावी लागतात कागदपत्रे
आता पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले काढण्यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी तयारी सुरू केली असून या सर्व विद्यार्थ्यांना व नागरीकांना इतर कामांसाठी वेळेत वय, राष्ट्रीयत्व व रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर रीनीव्हल प्रमाणपत्र आदी आवश्यकतेनुसार विविध प्रमाणपत्रे वेळेत सादर करावी लागतात. काही प्रमाणपत्रे व दाखले मिळण्याचा अवधी पंधरा दिवस ते एक महिना असतो. महाराष्ट्र शासनाने आधीच प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली असून वेळेत दाखले न मिळाल्यास अनेक होतकरू व गरजू विद्यार्थी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.