मुंबई : मुंबई महापालिकेच्या जागावाटपाने सुरू झालेला सेना भाजपा यांच्यातला वाद निकालानंतरही संपलेला नसून, आता राज्यातील देवेंद्र फ़डणवीस सरकारच बदलून टाकण्याच्या गोष्टी ऐकू येत आहेत. त्यात दोन्ही कॉग्रेस व शिवसेना मिळून पर्यायी सरकार बनवण्याचेही मनसुबे मांडले जात आहेत. अशा स्थितीत भाजपाला सरकार गमावणे परवडणारे नाही. म्हणूनच भाजपा शरणागत होईल अशी काही लोकांची अपेक्षा आहे. पण तशा हालचाली झाल्यास थेट विधानसभा बरखास्तीचा उपाय भाजपा अंमलात आणू शकतो. कारण त्यांच्या हाती राज्यपालाचेही पद आहे.
सेना-भाजपाचा वाद निवळण्याची चिन्हे नसून, मुंबईच्या महापौरपदासाठी रस्सीखेच चालू आहे. त्यात कॉग्रेसच्या पाठींब्यासह त्या पक्षाने तटस्थ राहून सेनेचाच महापौर होण्याला हातभार लावण्याच्याही कल्पना पुढे आणल्या गेल्या आहेत. पण वेगळ्या पातळीवर भाजपाला सत्तेतूनच हाकलण्याचीही खेळी करण्याचे मनसुबे चालल्याच्या बातम्यांनी भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. त्यावर विधानसभाच बरखास्त करून मुख्यमंत्री नव्याने मतदाराला सामोरे जाण्याचा पर्याय स्विकारण्याचा विचार सुरू झाला आहे. ताज्या निवडणूकांचे निकाल बघता भाजपाला पोषक राजकीय लोकमत असून, ते आणखी सहा महिने तसेच राहू शकेल. त्याचा लाभ उठवून भाजपाचेच एकहाती बहूमत आणण्याला, त्या पक्षाच्या गोटात चालना मिळाली असल्याचे वृत्त आहे.
ताज्या निवडणूकात भाजपा वगळता अन्य पक्षांनी कमालीची उदासिनता दाखवली आणि म्हणूनच तातडीने विधानसभा निवडणूक आल्यास सगळेच विरोधक गाफ़ील असतील. त्यांच्या तारांबळीचा पुरेपुर लाभ उठवून भाजपाला स्वबळावर १५०-१६० आमदार निवडून आणणे सहजशक्य असल्याची पक्षाच्या रणनितीकारांना खात्री वाटू लागलेली आहे. त्यामुळेच देवेंद्र सरकार पाडण्याच्या हालचाली होत असल्याचा सुगावा लागला, तरी मुख्यमंत्री हा टोकाचा पर्याय अंमलात आणू शकतील. राज्यपालही विनाविलंब तो सल्ला स्विकारू शकतील. त्यात कुठलीही कायदेशीर वा घटनात्मक अडचण येऊ शकणार नाही.