सेनेचा मी कर्जमुक्त होणारच मोर्चा

0

शहादा । मी कर्जमुक्त होणारच कर्ज मुक्तीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरणार अशा घोषणा देत शिवसेना कार्यालयापासून धडक मोर्चा तहसील कार्यालयावर येवून पोहचला होता. त्यानंतर तहसीलदार मनोज खैरनार यांना शेतकर्‍यांचा समस्यांचे निवेदन देण्यात आले. नंदुरबार शिवसेना जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे, उपजिल्हा प्रमुख धनराज पाटील यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेला. शेतकर्‍यांची दयनीय अवस्था झाली आहे, त्यांचे जगणे हे रोजचे मारणे बनले आहे. अस्मानी संकट सुरु आहे, पाऊस नाही, चारा नाही, अवकाळी गारपीटने पिके उध्वस्त झालेले आहे. कर्जाचा डोंगर डोक्यावर आहे, बँकेच्या नोटीसा आहेत, कर्ज फेडण्यास शेत मालास भाव तर मिळायला हवा सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

शेतीमालाला योग्य भाव द्या
शेतकर्‍यांच्या आर्थिक संकटाच्या फटका त्यांच्या मुलींच्या विवाहावर पडला आहे. शेतकर्‍यांची मुलांचा शिक्षणाचा खर्च करण्याची ऐपत राहिली नाही. शेतीत उत्पन्न नाही. माल आहे पण सरकार योग्य भाव देत नाही. शेतकर्‍यांकडे सावकारी, शासकीय देणे बाकी आहे. यासर्व कारणांमुळे शेतकर्‍याच्या घरी चुली पेटत नाही. शेतकरी शासनाकडे न्याय मागण्यास गेले तर त्यांना थातूर मातुर उत्तरे देवून उलट पाऊली पाठविले जाते असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

भाजपाचे सत्तेत आल्यावर घूमजाव
सत्तेत असलेल्या भाजपाचे मुख्यमंत्री यांनी गतकाळात विरोधी नेता असतांना शेतकर्‍यांना संपूर्ण कर्ज माफीसाठी लढा उभा केला होता. अनेक वर्षांनी सत्ताधारी पक्षांना डावलून जनतेने भाजपास सत्तेत बसविले आहे. परंतु, या सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यांवर सोडले असल्याचे म्हटले आहे. यापुढे जोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असे शिवसेनेने म्हटले आहे. शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. भाजप सत्तेत आल्यावर शेतकर्‍यांना विसरले असल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
मी कर्जमुक्त होणारच यासाठी शहादा तालुका शिवसेनेच्या वतीने आज दुपारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत मोर्च्यास प्रारंभ झाला. जिल्हा प्रमुख विक्रांत मोरे, उप जिल्हाप्रमुख धनराज पाटील, सह संपर्क प्रमुख दीपक गवते, मधुकर मिस्तरी, विमोड चौधरी, सुरेश मोरे, दिलीप पाटील, पुरुषोत्तम कुंभार, लखन बागुल, उद्धव पाटील, सुदाम पाटील, सुनील बेहरे, गिरधर कॅह्व्हान, अशोक माळी, संदीप पाटील, भाऊसाहेब माळी, प्रदीप निकुंभे, रवींद्र खैरनार, दीपक गिरासे, रमेश ठाकरे आदि उपस्थित होते.