मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सर्व नेत्यांना अचानक मातोश्रीवर दाखल होण्याचे आदेश दिले. तेथे उद्धव ठाकरे आणि मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचे सांगण्यात आलेे. या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होतेे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांकडून आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत, अशा वल्गना करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कोणत्याही क्षणी राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मातोश्रीवरच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उद्धव यांच्या आदेशानंतर आरोग्यमंत्री दीपक सावंत मातोश्रीवर दाखल झाले. मुंबईतील महापौर निवड झाल्यानंतरच भाजपकडून पुढची चाल खेळली जावू शकते. असा संदर्भ या बैठकीला होता.
जनसामान्यांमधील प्रतिमेची सेनेसह भाजपलाही चिंता
ताकद वाढवण्याची शिवसेनेची रणनीती
राज्यात भाजपने स्वबळावर घवघवीत यश मिळविले व मुंबईतही शिवसेनेला दणका दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर काळा पैसा व भ्रष्टाचारावरूनही हल्ला केला, किरीट सोमय्या यांनी ठाकरे यांची मालमत्ता व बोगस कंपन्यांमधील गुंतवणुकीबाबत सवाल केले. हे घाव वर्मी लागल्याने व भाजप शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी पावले टाकत असल्याने शिवसेनाही टोकाचा संघर्ष करण्याच्या मन:स्थितीत आहे. मुंबईच्या महापौरपदाचाच केवळ प्रश्न नसून 2019 मध्येही स्वबळावरच निवडणुका लढविल्या जातील. त्यावेळीही भाजप-शिवसेनेतच लढत होईल. त्यामुळे शिवसेनेची ताकद दाखवून देऊन ती वाढवत नेण्याची शिवसेनेची रणनीती आहे.
सरकार पणाला लावून निकराचा संघर्ष?
महापौरपद शिवसेनेकडून हिसकावून घेण्यासाठी राजकीय खेळी करीत संघर्ष करण्यावरून भाजपच्या नेत्यांमध्ये मतभेद असून ‘मुंबईच्या महापौरपदासाठी सरकार पणाला लावायचे का’ यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही द्विधा मन:स्थितीत आहेत. हा केवळ महापौरपदाचा मुद्दा नसून भाजप शिवसेनेला संपवायला निघालेली असल्याने अस्तित्वाच्या प्रश्नासाठी शिवसेना निकराच्या संघर्षांच्या पवित्र्यात आहे. मात्र, दिल्लीत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेबाबत सबुरीचा सल्ला दिल्याचे समजते. भाजपकडून ‘तह’ करण्यासाठी शिवसेनेला प्रस्ताव पाठविला जाणार आहे. मात्र, भाजपशिवाय अन्य कोणाचेही सहकार्य घेऊन महापौरपद मिळवायचे, असा चंग शिवसेनेने बांधला आहे. शिवसेनेने समझोता न केल्यास खेळी करुन धोबीपछाड टाकण्याचाही भाजपचा विचार आहे.
ताकद वाढवण्याची शिवसेनेची रणनीती
राज्यात भाजपने स्वबळावर घवघवीत यश मिळविले व मुंबईतही शिवसेनेला दणका दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर काळा पैसा व भ्रष्टाचारावरूनही हल्ला केला, किरीट सोमय्या यांनी ठाकरे यांची मालमत्ता व बोगस कंपन्यांमधील गुंतवणुकीबाबत सवाल केले. हे घाव वर्मी लागल्याने व भाजप शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी पावले टाकत असल्याने शिवसेनाही टोकाचा संघर्ष करण्याच्या मन:स्थितीत आहे. मुंबईच्या महापौरपदाचाच केवळ प्रश्न नसून 2019 मध्येही स्वबळावरच निवडणुका लढविल्या जातील. त्यावेळीही भाजप-शिवसेनेतच लढत होईल. त्यामुळे शिवसेनेची ताकद दाखवून देऊन ती वाढवत नेण्याची शिवसेनेची रणनीती आहे.
मुंबईचे महापौरपद हिसकावून डिवचणे नको
शिवसेनेला निवडणुकीत दिलेला दणका पुरेसा आहे. मुंबईचे महापौरपद हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्यास ते शिवसेनेला डिवचल्यासारखे होईल आणि तसे झाल्यास सरकारचा पाठिंबा काढून घेण्यास शिवसेना मागेपुढे बघणार नाही, असे भाजप नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे सरकारला पणाला लावून एक महापौरपद मिळविण्यापेक्षा शिवसेनेशी तडजोड करावी, अशी भूमिका सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांची आहे. पक्षश्रेष्ठी व मुख्यमंत्री फडणवीस मात्र शिवसेनेला अद्दल घडविण्याची हीच वेळ असल्याच्या भूमिकेत आहेत.
धाडसी निर्णयांच्या सावध चाली
महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील सामान्य लोकांमधील आपली प्रतिमा डागाळली जावू नये याची काळजी या दोन्ही पक्षांना आहे. सत्तेच्या राजकारणात एखादा निर्णय आततायीपणाने घेतला गेला, असा संकेत लोकांमध्ये गेला तर 2019 सालातील निवडणुकांमध्ये ती चूक महागात पडू शकते. लोकांसमोरील डागाळलेली प्रतिमा व प्रतिस्पर्ध्यांना मिळालेली टिकेची आयती संधी परवडणार नसल्याची जाणीव भाजप व सेनेलाही आहे. त्यामुळे कोणत्याच बदनामीचा डाग आपल्यावर येवू नये आणि समोरच्यांची खुन्नस तर जिरवता आली पाहिजे अशा डावपेचांमध्ये या दोन्ही पक्षांचे नेते सध्या विविध स्तरावर विचार विनिमय करीत आहेत. भाजपच्या दृष्टीने अशा निर्णायक काळात संघाची भूमिकाही महत्वाची मानली जाते.