सेनेला पटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचीही भोजननीती!

0

मुंबई (गिरिराज सावंत): शेतकरी कर्जमाफी प्रश्‍नी आणि अर्थसंकल्पावरून राज्य सरकार अडचणीत येवू नये तसेच शिवसेनेला राजकीय शह देण्याच्या उद्देशाने विरोधी पक्षातील 19 आमदारांवर राज्य सरकारने निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील संबध कमालीचे ताणले गेले. हे ताणलेले संबंध पुन्हा पूर्वरत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही आता शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना जेवणासाठी आमंत्रित करणार असून त्यासाठी त्यांना लवकरच निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती भाजपमधील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

एनडीएतील घटक पक्षांसाठी सोहार्दाचे संबंध रहावेत आणि त्यांच्याशी चर्चा करता यावी याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांना दिल्लीत जेवणाचे आमंत्रण दिले आहे. त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, तेथे सर्वच घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याने उध्दव ठाकरे यांच्याशी पंतप्रधान मोदी किती वेळ चर्चा करतील हे सांगता येणार नाही. त्यामुळे शिवसेना आणखी नाराज होवून त्याचा परिणाम राज्यातील सरकारवर होवू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: डिनर डिप्लोमसी करण्याचे ठरवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यातच उत्तर प्रदेशमधील मोठ्या विजयानंतर जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी मोदी यांचे वैयक्तिकरित्या अभिनंदन केले आहे. मात्र, शिवसेनेकडून अद्याप साधे पत्रही लिहून पंतप्रधानांचे अभिनंदन केले गेलेले नाही. तसेच राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नांवरून शिवसेनेने विरोधकांच्या आवाजात आवाज मिसळत अर्थसंकल्पाच्या मंजुरीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण केले. त्यावर तोडगा आणि राजकिय कुरघोडीचा भाग म्हणून राज्य सरकारनेही विरोधी पक्षातील 19 आमदारांवर निलंबनाची कारवाई करत राज्य सरकारवरील धोका टाळला. मात्र ही कारवाई करताना भाजपने शिवसेनेला कोणत्याही प्रकारे विश्‍वासात घेतले नाही. त्यामुळे शिवसेनेची सरकारच्याविरोधात नाराजी वाढली. ही नाराजी दूर करण्याकरता आमदारावंरील निलंबन मागे घेण्याच्या प्रक्रियेत शिवसेनेला सहभागी करून विश्‍वासाहर्ता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

परिस्थिती अशीच राहिली तर त्याचा परिणाम राज्य सरकारवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आहे त्यापेक्षा अधिक चांगले संबंध दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा निर्माण व्हावेत, यादृष्टीने उध्दव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सांसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट हे लवकरच मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी जाणार आहेत. या दोन नेत्यांसोबत भाजपच्या महाआघाडीतील पक्षांनाही सहभागी करून घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.