सेनेला पाठींबा देण्याबाबत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने सस्पेन्स वाढविला !

0

मुंबई: राज्यात भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून बिनसले असल्याने भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला आहे. आता शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पाठींब्यावर सरकार बनविणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. अद्याप आमचा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. जो निर्णय घ्यायचा आहे तो आघाडी मिळून घेईल असे शरद पवारांनी सांगितले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सांगितले आहे. तसेच, बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे, आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असेही पटेल यांनी म्हटले आहे.

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळू नये वेळेप्रसंगी विरोधी पक्षात बसू असं षडयंत्र भाजपाचं शिवसेनेविरोधात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे देशद्रोही नाही, सर्व पक्षाचे अन् नेत्यांचे राज्यासाठी आणि देशासाठी योगदान राहिलं आहे. सगळ्या नेत्यांच्या एकमेकांशी संवाद सुरु आहे. राजकीय स्थितीचं भान सगळ्यांना आहे. त्यामुळे भाजपाचा मुख्यमंत्री नको, म्हणणारे पक्ष योग्य निर्णय घेतील, असा आशावाद शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीला हजर राहण्यास आलेले प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीची भूमिका सांगितली.