सेनेला मोठा धक्का : धनुष्यबाणाचे चिन्ह तात्पुरता गोठवले

Big decision of Election Commission! Nobody has a bow and arrow for the Andheri by-election! मुंबई : राज्यात खरी शिवसेना कोणती? यावरून वाद सुरू असताना निवडणूक आयोगाने आता मात्र अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे पक्ष चिन्ह गोठवल्याने शिवसेनेसाठी ही बाब धक्का मानली जात आहे.अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी, उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही, असे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

हंगामी निर्णयामुळे उडाली खळबळ
खरी शिवसेना कोणती? यावर अद्याप निवडणूक आयोगाला निर्णय घेता आलेला नाही. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हा हंगामी निर्णय घेण्यात आला आहे. अंधेरी पोटनिवडणूक अगदी जवळ येऊन ठेपली असताना निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्काच मानला जात आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे आयोगाकडून तात्पुरत्या स्वरूपात गोठवलं गेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. त्यासोबतच, नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यावे लागणार आहेत.

दोन्ही गटांनी केले होते दावे
ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आपापले दावे करण्यात आले होते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीत दोन्ही दाव्यांवर विचार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे तात्पुरते गोठवण्यात आल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं.

निवडणूक कधी? उमेदवार कोण?
शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार असून ६ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी अद्याप तरी कोणीच आपला उमेदवार जाहीर केलेला नाही, पण शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर भाजपाकडून मुरजी पटेल यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रविवारी दोन्ही गटांतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.