सेनेसोबत जमले नसल्याच्या संदेशामुळे अजित पवारांसोबत गेलो: आमदार अनिल पाटील

0

मुंबई: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबतचे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील चर्चा संपता संपत नसल्याने अजित पवारांनी भाजपला पाठींबा दिला. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. सोबतच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत काही आमदार होते. त्यातील सगळे आमदार परत पक्षात आले. आज सोमवारी सकाळी तीन आमदार दिल्ली, हरियाना येथून परतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सरकार स्थापनेबाबत वारंवार चर्चा होऊनही शिवसेनेसोबत काही जमत नसल्याचा संदेश आमच्यापर्यंत आल्याने आम्ही अजित पवारांसोबत गेलो होतो, असे स्पष्टीकरण अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी दिले आहे.

“आम्ही कुठेही बंडखोरी करुन गेलो नव्हतो ही केवळ अफवा होती. या काळात आमचा सुप्रिया सुळे, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी संपर्कात होतो.” राज्यात एनसीपीचे सरकार बनणार आहे, असा विश्वासही आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.

“शिवसेनेसोबत काही जमत नसल्याचा संदेश आम्हाला आला. त्यामुळे बाकीचे आमदार येतील आपल्याला पुढे जायचं आहे, असे सांगण्यात आले त्यामुळे आम्ही अजित पवारांसोबत गेलो. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार पळून गेले असं काहीही नव्हतं. दरम्यान, आम्ही शरद पवारांना फोन केला त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला शिवसेना, काँग्रेससोबतच जायचं आहे. त्यामुळे आम्ही त्यांना अश्वस्त केलं की आम्ही पुन्हा येत आहोत,” असे राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.