नवीन वर्षांत नवा विक्रम; 35 हजारांचा टप्पा ओलांडला
मुंबई : अर्थव्यवस्थेविषयी गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच, भारतीय शेअर बाजाराने बुधवारी ऐतिहासिक टप्पा ओलांडला. सेन्सेक्सने 35 हजारांचा टप्पा ओलांडून विक्रमी कामगिरी केली. 250 अंकांनी सेन्सेक्स वाढून तो 35 हजाराच्या वर स्थिरावला. तर निफ्टीनेही दिवसाअखेर 10,777 टप्पा ओलांडला. खरेदीदार वाढल्याने मुंबई शेअर बाजाराने हा उच्चांक गाठला आहे. त्याप्रमाणेच आयटी कंपन्यांचे रेटिंग वाढल्याचाही सकारात्मक परिणाम दिसून आला. दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी शेअर बाजाराने 312.89 अंकांची उसळी घेत 35,083पर्यंत पोहोचला. तर बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्येही 300 अंकांची वाढ झाली होती.
40 हजाराचा टप्पा ओलांडण्याचा आशावाद
इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस, एचसीएलसह दुसर्या कंपन्यांचे टार्गेटही वाढवण्यात आले आहे. आयटी रेटिंग वाढल्यामुळे शेअर बाजार वधारला असून, बँकिंग, ऑटोमोबाईल क्षेत्रातील शेअर्सला याचा चांगला फायदा झाला. अॅक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस बँकसारख्या बँकांचे शेअर्स तेजीत आले होते. रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी यांनी पश्चिम बंगालमध्ये 5 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे भारत दौर्यावर असून, त्यांच्या या दौर्यात अनेक करारांवर स्वाक्षरी होणार आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले. येत्या वर्षभरांत सेन्सेक्स 40 हजारांचाही टप्पा ओलांडेल, असा विश्वास शेअर बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.