डॉ.युवराज परदेशी: देशातील भांडवली बाजाराच्या शेकडो वर्षाच्या इतिहासात मुंबई शेअर बाजाराची गुरुवारी सुवर्ण अक्षरात नोंद झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेला सेन्सेक्सने ऐतिहासिक 50 हजार अंकांचा उंबरठा ओलांडला. आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक कल आणि जो बायडन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यामुळे झालेल्या सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून आले. कोरोना आणि लॉकडाऊननंतर प्रथमच एवढी मोठी सेन्सेक्सने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. लॉकडाऊन काळात तळाला पोहोचलेले निर्देशांक एप्रिल 2020 पासून आता 80 टक्के वर आहेत. डिसेंबर 2021 पर्यंत निफ्टी 15,000 चा टप्पा पार करेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
मरगळलेली अर्थव्यवस्था रुळावर येण्याची ही चिन्हे असल्याचेही मानण्यात येत आहे. कारण शेअर बाजाराची ही उसळी केवळ आंतरराष्ट्रीय बाजारातील उलाढालीमुळेच नसून यास देशांतर्गत सकारात्मक परिस्थितीही तितकीच कारणीभुत आहे. देशभरात करोना लसीकरणाची मोहीम जोमाने सुरु झाली आहे. त्यातच केंद्र सरकार अर्थसंकल्पाच्या तयारीला लागले आहे. येत्या 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाणार आहे. याबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता आहे. त्यामुळे भांडवली बाजारात अलीकडच्या काळात गुंतवणुकीचा ओघ वाढला असे म्हणणेच जास्त संयुक्तीक आहे.
शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल अनेकांना आकर्षण असते. मात्र नकारात्मक विचारसरणी आणि गैरसमजामुळे हा सर्वसामान्यांचा विषय नाही, असे म्हणून अनेकजण यापासून चार हात लांबच राहणे पसंत करतात. भारतीय शेअर बाजारला जुना इतीहास आहे. भारतात 1857 साली पहिल्या शेअर बाजाराची मुंबईत स्थापना झाली. जो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएससी)या नावाने ओळखला जातो. यानंतर कापड मिलच्या ट्रेडिंगसाठी 1894मध्ये अहमदाबाद शेअर एक्सचेंजची सुरुवात करण्यात आली.
1908मध्ये कलकत्ता स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आली, तर 1920 साली मद्रास स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यात आला. पुढे सुधारणा प्रणालीमधून 24 वेगवेगळे स्टॉक एक्सचेंज एकत्रितपणे 1993 साली स्थापन झालेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएससी) द्वारे स्वयंचलित व्यापार प्रणालीनुसार कार्यान्वित झाले. मात्र अजूनही शेअर बाजारात गुंतवणूक करणार्यांची टक्केवारी अगदी नगण्य आहे. आता सेन्सेक्सची ही पन्नास हजारी उसळी नव्या गुंतवणुकदारांना आकर्षित करणारी ठरु शकते. गेल्या वर्षभरापासून जागतिकस्तरावर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याने त्याचे एकामागून एक हादरे जागतिक अर्थव्यवस्थेला बसत आहेत.
भारतात नोटाबंदीपासून भारतीय अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी अद्यापही रुळावर आलेली नाही. या संकटांच्या मालिकेतून बाहेर निघण्यासाठी धडपड सुरु असताना कोरोना व्हायरसच्या संकटाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात संपूर्ण लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे अनेक क्षेत्रांचे नुकसान झाल्याने देशाची आर्थिक व्यवस्थ्या पूर्णपणे कोलमडून पडली. याकाळात जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांकडे पाहता भारतात सर्वात मोठी घसरण झाली. भारतातील इतक्या मोठ्या घसरणीकडे पाहता वर्षभर अर्थव्यवस्था निगेटिव्ह झोनमध्ये राहण्याची शक्यता अर्थतज्ञ व्यक्त करत असले तरी, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने रुळावर येण्याचे भाकित अनेक वित्तीय संस्थानी वर्तविले होते. याची प्रचिती गेल्या काही दिवसांपासून येतांना दिसत आहे. मागील आठ महिन्यांपासून घट्ट झालेला कोरोनाचा विळखा सैल होत असल्याने देशाची अर्थव्यवस्थाही रुळावर येवू लागली आहे. नोव्हेंबरमध्ये झालेले जीएसटीचे संकलन एक लाख चार हजार कोटी रुपयांवर, तर डिसेंबरात ते एक लाख 15 हजार कोटींपर्यंत पोचले.
थंड पडलेली अर्थव्यवस्था पुन्हा हलू लागल्याचे लक्षण म्हणता येईल. यासह मालमत्तांच्या खरेदी-विक्रीत दिसत असलेला उत्साह, शेअर बाजारातील तेजीचे वारे, यामुळे अर्थकारणाच्या बाबतीत उत्साहाचे वातावरण आहे. परकीय चलनाच्या साठ्यातही वाढ झाली 560 दशलक्ष डॉलर्स इतकी झाली असून तेदेखील विक्रमी असून सर्व आकडेवारीवरून देशाची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे संकेत आहेत. भारतीय रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतीय अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रिझर्व्ह बॅँक समर्थ असल्याचे केलेले प्रतिपादन बाजाराला नवीन बळ देऊन गेले. त्याचप्रमाणे विविध कंपन्यांमध्ये सुरू झालेले उत्पादन आणि बाजारातील वाढत असलेली मागणी यामुळे शेअर बाजारामध्येही चांगले वातावरण निर्माण झाले आहे. जो बायडन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्याचा परिणाम आणि जागतिक बाजारातून घरगुती बाजाराला मिळत असलेले सकारात्मक कल याच्या जोरावर सेन्सेक्सने ऐतिहासिक 50 हजारांचा टप्पा पार केला. अमेरिकेतील शेअर बाजारामध्येही जो बायडन यांच्या शपथविधीचा परिणाम दिसून आला. डाओ जोंस आणि नॅसडॅक नवा विक्रम करत बंद झाला. बुधवारी डाओ जोंसमध्ये निर्देशांक 258 अंकाची वाढ होत 31188 पर्यंत पोहोचला. तर नॅसडॅक 260 अकांच्या तेजीसह 13457 वर बंद झाला. एसएंडपी500 मध्ये 53 अंकांची वाढ होत 3852 वर निर्देशांक बंद झाला.
भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. शेअर बाजार उघडल्यानंतर बाजारात गुंतवणूकदारांना जवळपास 4.40 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांची मार्केट कॅप 1,97,70,572.57 कोटी रुपये होता. गुरुवार बाजार सुरु झाल्यानंतर 1,35,552 कोटी रुपयांची वाढ झाली आणि मार्केट कॅप 1,99,06,124,57 कोटी रुपये झाला. परकीय वित्तसंस्था मोठ्या प्रमाणावर भारतीय भांडवली बाजारात पैसे गुंतवत असल्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकही 50 हजारांवर पोहचला आहे. परकी चलनाची गंगाजळीही वाढलेली आहे. तथापि, अशा प्रकारची शेअर बाजारातील गुंतवणूक फक्त भारतात होत आहे, असे नाही; तर जगभरच हा भांडवलाचा प्रवाह वाहतो आहे.
युरोप-अमेरिकेतील कमी किंवा उणे व्याजदरांमुळे उदयोन्मुख बाजारपेठांकडे गुंतवणूकदारांनी मोहरा वळविला आहे. दुसरे म्हणजे, कोरोनावरील लस आल्याने आणि त्याविषयीची भीती बर्याच प्रमाणात दूर झाल्यानेदेखील भांडवली बाजारात उत्साह दिसतो. मात्र भारतीय भांडवली बाजारातील तेजीला मर्यादा असून वर्ष 2021 मध्ये प्रमुख सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक वार्षिक तुलनेत एकेरी अंकवृद्धी नोंदवतील, असा अंदाज बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज या दलालीपेढीने व्यक्त केला आहे. यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करतांना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यकच आहे.