सेन्सॉरशिपच्या नियमांविरोधात अमोल पालेकर यांची याचिका

0

नवी दिल्ली – चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच्या सेन्सॉरशिपच्या नियमात बदल व्हावेत या मागणीसाठी प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. अमोल पालेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून न्यायमूर्ती एके सीकरी आणि अशोक भूषण यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.

तसेच सेन्सॉर बोर्डावर न्यायालयीन पार्श्‍वभूमीचा एकही सदस्य नसल्याने चित्रपटाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काकडे दुर्लक्ष होते, असे याचिकाकर्त्याचे वकिल गोपाल सुब्रमण्यम यांनी न्यायालयाला सांगितले आहे. अमोल पालेकर यांनी याचिकेमध्ये सिनोमॅटोग्राफी कायद्यातील तरतुदींनादेखील आव्हान दिले आहे.

आजच्या इंटरनेटच्या जमान्यात सेन्सॉरशिप अयोग्य असल्याचे अमोल पालेकर यांचे स्पष्ट मत आहे. पालेकर यांनी सेन्सॉरशिपच्या पद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले असून, काही मार्गदर्शक तत्वे आखून देण्याची विनंतीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.