नाशिक । सेन्सॉर बोर्ड इंग्रजांसारखेच आहे. विशेष म्हणजे ते फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्येच काम करते. उद्याचे मराठी नाटक चांगले चालावे असे वाटत असेल, तर सर्वप्रथम सेन्सॉर बोर्ड रद्द करा, असे परखड मत ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी नाशिकमध्ये व्यक्त केले. नाटक संपल्यामुळे लेखक, नाटककार संपतच आहेत. नाट्यक्षेत्राला बळ देण्यासाठी सरकारने प्रभावी योजना राबविल्या नाहीत, तर शेतकर्यांप्रमाणेच नाट्यकलावंतांनाही आत्महत्या कराव्या लागतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
नाटकातून अर्थार्जनाने प्रपंच कठीण
सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यानिमित्त आयोजित ‘नाटक काल आज आणि उद्या’ या विषयावर पेठे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाटकककार योगेश सोमण, अध्यक्ष दत्ता पाटील उपस्थित होते. यावेळी पेठे म्हणाले, की शेतकरी शेतात राबतो तसा मी नाटकात राबणारा माणूस आहे. नाटकातून अर्थार्जन करून प्रपंच चालविणे हल्ली कठीण आहे. मराठी नाटक कायम पुरोगामी राहिले. विचारप्रवण करणारे नाटक लिहिणे ही मराठी रंगभूमीची खासियत आहे. कोणतीही कलाकृती अशी असावी की ती पाहून, ऐकून हादरा बसला पाहिजे. कलाकृती पाहणार्यात मानसिक, बौध्दिक आणि वैचारिक क्रांती घडायला हवी तीच खरी कलाकृती ठरते. नाटक वाढावे असे वाटत असेल तर धार्मिक उन्मादावर नाट्यक्षेत्रातील मंडळींनी लक्ष ठेवायला हवे. जागतिक दृष्टिकोनाचे भान असलेले नाटक येत नाही तोपर्यंत नाटक वाढणार नाही असे मत पेठे यांनी व्यक्त केले.