अमेरिका । टेनिस स्टार सेरेना विल्यम्सने 1 सप्टेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तिच्या मुलीचा पहिला फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोखाली सेरेनाने एक खास संदेश लिहला आहे. ज्युनियर एलेक्सिस ओलंपिया ओहानियन असे सेरेनाच्या मुलीचे नाव आहे. या फोटोवर अवघ्या काही तासात 8 लाखाहून अधिक लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या फोटोसोबतच सेरेनाने तिच्या मुलीचा या जगात येण्यापूर्वीचा प्रवासही एका भावूक युट्युब व्हिडिओतून उलगडला आहे.
यादरम्यान सेरेनाने गरोदरपणाच्या काळातील काही खास क्षण तिच्या फॅन्ससमोर ठेवले. 8 आठवड्यांची गरोदर असतानाही सेरेना ऑस्ट्रेलियन ओपन खेळली आणि ती जिंकलीही. गरोदरपणाच्या काळात काही अडथळेदेखील आले पण त्यावर मात करून एका सुदृढ मुलीला जन्म दिल्याचा आनंद सेरेनाने सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. 23 ग्रॅन्ड स्लॅम जिंकणार्या सेरेना विल्यमन्सने टेनिस विश्वात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे. गरोदरपणाच्या काळात टेनिसपासून दूर गेलेली सेरेना येत्या जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत उतरण्याची शक्यता आहे.