मुंबई : हिवाळी अधिवेशनांनंतर गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विजयासोबत नव्या वर्षाच्या सेलिब्रेशन मुडमधून सरकार आणि अधिकारीवर्ग बाहेर आलेला नाही. अनेक अधिकारी आणि मंत्री नागपूरवरून निघाले मात्र आठवड्याचे तीन दिवस संपले तरी मंत्रालयात काही पोहोचलेले दिसून येत नाहीत. हिवाळी अधिवेशनामुळे राज्यभरातील जनतेची सरकार दरबारी असलेली कामे जवळ-जवळ महिनाभर थांबतात. मात्र अधिवेशन संपल्यानंतरचा आठवडा दुरून येणाऱ्या नागरिकांसाठी त्रासाचा ठरत आहे. गेले तीन दिवस मंत्रालय अजून सुने सुनेचं दिसून येत आहे. मंत्र्यांचा नागपूर अधिवेशनाचा थकवा कदाचित अद्याप गेलेला नाही तर अधिकारी वर्गाची सुट्टी अजून संपलेली नसल्याचे चित्र मंत्रालयात दिसत आहे. आता ते नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असल्याची चर्चा रंगत आहे. यामुळे नागपूर अधिवेशनानंतर शासन दरबारी फेऱ्या मारणाऱ्या सामान्य लोकांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. मंत्रालयात मंत्री तर नाहीच पण त्यांचे अधिकारी ही मोठ्या सुट्ट्यांवर असल्याने भेटायचे तरी कोणाला हा प्रश्न सामान्य लोकांना पडत आहे.
मुख्यमंत्री शपथविधीसाठी दुसऱ्या राज्यात
आठवड्याचे सुरुवातीचे दिवस म्हटले कि मंत्रालयात मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी वर्दळ असते. मंत्रालयातील ही गर्दी म्हणजे मंत्री असल्याचे प्रमाण असते. मात्र नागपूर अधिवेशन संपून २ दिवस उलटले तरी सेनेचे २-३ मंत्री आणि भाजपचे एक दोन मंत्री सोडले तरी कुणीही मंत्रालयात नाही. मुख्यमंत्री स्वतः दुसऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रम करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीलाही आधिवेशनानंतर पहिल्या आठवड्यात खो दिला आहे.
आता उपस्थिती नवीन वर्षातच
मंत्रालयात मंत्रीच नसतील तर सामान्य लोकांनी आपल्या व्यथा आणि प्रश्न मांडायचे कोणासमोर हा प्रश्न उभा राहिला आहे. मंत्र्यांचे खाजगी सचिव आणि वरिष्ठ अधिकारीही मंत्रालयातून बेपत्ता आहेत. हिवाळी अधिवेशन संपताच काही अधिजकाऱ्यांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सुट्ट्या घेतल्या असून ते पुढील वर्षात मंत्रालयात येणार असल्याची माहिती आहे. तर कक्ष अधिकारी किंवा उपसचिव सारखे अधिकारी नागपूरवरून अजून आले नसल्याने कामावर रुजू झालेले नाहीत अशी परिस्थिती आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण भाजप नेत्यांनी करू नये, पाश्चात्य कपडे घालू नये तसेच दारूचे व्यसन करू नये असे विधान नुकतेच सुब्रमण्यनम स्वामी यांनी केले. मात्र महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना सेलिब्रेशनचा मूड अद्यापतरी मंत्रालयापासून दूर ठेवून आहे. यामुळे सोलापूरहून आलेल्या एका नागरिकाने जनशक्तिशी बोलताना आपला संताप देखील व्यक्त केला. गेले दोन दिवस झाले कामासाठी मंत्रालयात येत आहे, मात्र साहेब उद्या येतील असे सांगून टाळले जात असल्याचे त्या नागरिकाने सांगितले.