सिंहगड । पर्यटनस्थळी गेल्यानंतर प्रत्येकाला सेल्फीचा मोह आवरता येत नाही. परंतु या सेल्फीने अनेकांना जीव गमवावे आगले आहेत. याच सेल्फीच्या नादात एक गरोदर महिला 150 फूट खोल दरीत पडल्याची घटना शनिवारी सायंकाळी सिंहगडावर तानाजी कडा येथे घडली. सुदैवाने ती यातून बचावली असून तिला किरकोळ जखमा झाल्या आहेत. प्रणिता लहू इंगळे (वय 28, रा. लातूर) असे तिचे नाव आहे.
प्रणिता पती लहू इंगळे आणि भाऊ सुरेश जगताप यांच्यासोबत सिंहगडावर फिरण्यासाठी आली होती. दरडी पडत असल्याने घाट रस्ता बंद आहे. म्हणून हे तिघे त्यांच्या मोटारीने सिंहगड पायथा आतकरवाडी येथे आले. तेथून पायवाटेने गडावर आले होते.
अशी घडली घटना
सायंकाळी 6.30 ते 7 च्या दरम्यान तानाजी कड्याजवळ प्रणिता, लहू आणि सुरेशफोटो काढत होते. कड्या जवळ सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी रेलिंग लावले आहेत. परंतु प्रणिता रेलिंगच्या बाहेर जाऊन फोटो काढत होती. पावसाळी दिवस असल्याने आणि पावसाच्या सरी पडत असल्याने या ठिकाणचा भाग निरसरडा झाला आहे. फोटो काढण्याच्या नादात तिचा पाय घसरला आणि ती 150 फूट खोल दरीत पडली. त्यावेळी तिच्या पतीने आरडा ओरडा करून गडावरील लोकांकडे मदत मागितली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला बाहेर काढण्यात आले.