मुंबईतील शिवाजीपार्कच्या काही रहिवाशांनी सेल्फी पॉइंटनाही विरोध केल्याने महापालिका आयुक्तांनी ते रद्द केले आहेत. याबातमीनंतर आता एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला की शिवाजी पार्कच्या या काही रहिवाशांना नेमके पाहिजे तरी काय? आपण कसे जगायचे हा प्रत्येकाचा आपला अधिकार असतो. व्यक्तिस्वातंत्र्याच्या आड कोणीही येता कामा नये. यामुळे चार भिंतींच्या आड आपल्या घरात शिवाजी पार्कच काय जगातील कोणीही काहीही करत असले तरी कोणी त्याची चौकशी करण्याचे कारण नाही. आणि त्यावेळी त्यांचे स्वत:च्या खाजगी जीवनात, खाजगी जागेत नेमके काय करावे आणि काय करु नये हे सांगण्याचा कोणाला अधिकारही नाही. मात्र आता वेगवेगळ्या कारणांमुळे शिवाजी पार्क चर्चेत येत आहे ते फक्त इतर कोणीतरी काय करावे आणि काय करु नये अशा फतव्यांमुळे आणि त्या भागातील काही उचभ्रूंच्या प्रभावी संपर्कामुळे तातडीने दखल घेतली जाऊन त्या सर्व फतव्यांवर अंमलबजावणी होत असल्याने. त्यामुळेच आता त्याची दखल घेऊन चिकित्सा करणे भाग आहे.
शिवाजीपार्क काही रहिवाशांचा हा फतवेवाला स्वभाव पहिल्यांदा लक्षात आला आणि खुपलाही तो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजेच ६ डिसेंबरला येणाऱ्या लाखो भीम अनुयायांविषयीच्या कुजकट दर्प येणाऱ्या छुप्या चर्चेमुळे. हे येतात आणि आमचे शिवाजीपार्क घाण करतात. पण अशी चर्चा करणारे महाभाग विसरायचे ते याच लाखो भीमशक्तीच्या कौतुकास्पद संयम आणि शिस्तीला! एवढ्या वर्षांमध्ये राजकीय कुरघोडीची उदाहरणे सोडली तर लाखोंची जनसागर लोटत असूनही कधीही काही अप्रिय घटना घडल्याचे ऐकिवात नाही. काही अपवाद असतील नाही असे नाही. मात्र लाखोंच्या गर्दीसमोर ते अपवाद म्हणजे शिवाजीपार्कच्या चौपाटीतील वाळूतील एखाद्या कणासारखेच!
गेली काही वर्षे तर मुंबई महापालिका, सामाजिक संस्था कौतुकास्पद नियोजन करतात. तसेच समाजातील परिस्थिती बदलत गेली. आंबेडकरी समाजातही बदल घडले. आर्थिक परिस्थितीत बदल झाला. दरवर्षी चैत्यभूमी परिसराला भेट देताना हा सकारात्मक बदल दिलासा देऊन जातो. शैक्षणिक, आर्थिक परिस्थितीतील हा बदल वागण्यातही आपोआप बदल घडवत असतो. त्याचेही दर्शन तेथे घडत असते. एकीकडे हजाराचीही आवृत्ती खपण्याची मारामारी असलेल्या मराठी साहित्यजगताने अभ्यास करावा असा पुस्तकांचा खप ६ डिसेंबरच्या एका दिवसात होताना दिसतो. का नाही हो कधी याचे कौतुक झाले?
माणूस हा समाजप्रिय मानला जातो. एकाकी राहण्यापेक्षा एकत्र राहणे आवडते. एकीकडे ६ डिसेंबरला नाके मुरडायची तर दुसरीकडे दसरा मेळाव्याला कानावर हात गच्च दाबायचे! गर्दी दिसली की अंगावर पाल पडते की काय काहींच्या? शिवसेनेची दसरा मेळाव्याला लोटणारी गर्दी ही सुद्धा कौतुकास्पद शिस्त, संयमाचे दर्शन घडवते. उत्साहाला उधाण आलेले असते पण शिस्तीच्या किनाऱ्याची मर्यादा पाळली जाते. तेथेही पुन्हा दरवेळी मेळावा होऊ नये म्हणून काड्या करणारे आहेतच!
शिवाजीपार्कच्या सर्व नाही पण काहींना माणसांचेच वावडे आहे की काय? असा प्रश्न आता सेल्फी पॉइंटच्या निमित्ताने समोर आला आहे. मी मोदीद्वेषग्रस्त नसलो तरी मोदीभक्तही नाही. त्यामुळे स्वत:च्याच प्रेमात अमळ जास्तच पडून सेल्फी काढत बसत नाही. मात्र तरीही जीवाला धोका न करुन घेता सेल्फी काढणाऱ्यांना चुकीचेही मानत नाही. त्यामुळे मनसेचे तरुण नेते संदिप देशपांडे यांनी काही वर्षांपूर्वी सेल्फी पॉइंटची अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणली तेव्हा कौतुकच वाटले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी आर्थिक अडचण सांगत तो बंद करत असल्याची घोषणा केली तेव्हा वाईटही वाटले. भाजपच्या आशिष शेलारांनी पटकन त्या पॉइंटला सुरुच ठेवण्याची घोषणा केली तेव्हा बरेही वाटले. तसेच शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांच्याही सेल्फी पॉइंट बंद न पडू देण्याच्या निर्धारामुळे आनंद आणखी वाढला. राज ठाकरेंच्या आदेशाने मनसेने पुन्हा एकदा सेल्फी पॉइंट सुरुच ठेवण्याचा यूटर्न घेतल्यावरही पहिल्यांदाच राजकीय यूटर्नचे वाईट वाटले नाही.
सेल्फी पॉइंट काही जीवनावश्यक नाही. कळते तेवढे. मात्र तरुणाईला काही सोयी जीवनावश्यक नसल्या तरी पुरवण्यात काही गैर नसते. त्यामुळे आता एकाच वेळी तीन सेल्फी पॉइंट मिळतात की काय याची गंमतही वाडली. मात्र तेवढ्यात कळले की शिवाजी पार्कच्या काहींच्या विरोधामुळे आयुक्तसाहेबांनी ते सर्वच पॉइंट रद्द केले. त्यामुळे शिवाजीपार्कची ही काही लोकं असे का वागतात असा प्रश्न पडला. सातत्याने ते हे नको ते नको करत असल्याने आता वाटू लागले आहे की जशी मुंबई महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र मुंबईत दिसत नाही, असे वसंतदादांना सुनवावे लागले तसेच शिवाजीपार्कच्या या काही डोक्यांना सांगावे लागणार की शिवाजीपार्क मुंबई-महाराष्ट्रातच आहे, आमच्याच समाजातच आहे, पण तुम्ही शिवाजीपार्कातून मुंबई-महाराष्ट्र, सारा समाजच हद्दपार करु लागला आहात. आता बसं झाले. शिवाजीपार्कचे सर्वच लोक काही माणूस घाणे नाहीत. काहीच असतील. पण त्यांच्यामुळे साऱ्या शिवाजीपार्काचेच नाव खराब होऊ लागले आहे. त्यामुळे अशांना समंजस असलेल्यांनी वेळीच आवरले पाहिजे. नाही तर सगळीकडे शिवाजीपार्कचे सेल्फीश म्हणून विनाकारण सर्वांचीच बदनामी होईल! महान परंपरा असणाऱ्या या परिसराची अशी बदनामी कोणाच्याही मनाला पटणारी नसेल!