चाळीसगावमधील एकाचा मृतदेह सापडला
लोणावळा : पवना धरणात दोन तरुण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ठाकुरसाई येथे कॅम्प साईट येथे घडली. दोघांपैकी एका तरुणाचा मृतदेह हाती लागला असून दुसर्या तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. दोघेही संगणक अभियंता असून पुण्यातील एका कंपनीत नोकरीला होते. मोहित अनिल जाधव (वय 28 रा. सुवर्ण मंदिर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव) आणि वेदप्रकाश चंदलाल राणा (वय 28 नागपूर) अशी त्यांची नावे आहेत. यापैकी मोहितचा मृतदेह हाती लागला आहे. आयएनएस शिवाजी व शिवदुर्ग टीम यांच्याकडून शोधकार्य सुरु आहे.
दोघेही संगणक अभियंता
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पवना धरणाच्या परिसरात नऊ जणांचा ग्रुप फिरण्यास आला होता. रात्री त्याठिकाणी त्यांनी मुक्काम केला. आज सकाळी जाधव आणि राणा दोघेजण धरणाच्या पाण्याजवळ फोटो काढण्यासाठी गेले. त्यातील एक जण सेल्फी काढत असताना पाण्यात पडला. तो बुडत असल्याचे पाहून त्याच्या सोबतच्या मित्राने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तोही बुडाला. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आयएनएस शिवाजी टीमच्या पथकाने शोध घेऊन दोघांपैकी एकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. दुसर्या तरुणाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.