मुंबई : गोरेगाव येथे आरे कॉलनीत दोन अल्पवयीन मुलींनी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी संध्याकाळी घडली आहे.आत्महत्या केलेल्या दोन्ही मुली या १७ वर्षांच्या असून त्या शाळेत शिकत होत्या. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेचा अधिक तपास आरे पोलीस करत आहेत. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी या मुलींनी विहिरीजवळचा सेल्फी काढून भावाला पाठवला होता.
अनिता पाड्यात राहणाऱ्या १७ वर्षांच्या दोन मुली या चांगल्या मैत्रिणी होत्या. या दोघींनी मंगळवारी संध्याकाळी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली.आत्महत्येपूर्वी दोघींनी मोबाईलवर सेल्फी काढून तो मित्रमैत्रिणींना पाठवला. तर यातील एका मुलीने विहिरीलगत काढलेला सेल्फी भावालाही पाठवला होता. ‘आम्ही आत्महत्या करत आहोत’, असा मेसेजही त्यांनी फोटोसोबत केला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हा प्रकार समजताच मुलीच्या भावाने आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरे पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते. दोघींनाही विहिरीबाहेर काढून तातडीने गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोघींचाही रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मृत्यू झाला होता.