सेल्वराजन यांना स्वराज यांचा आधार

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)  – सध्या दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार घेत असणार्‍या केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज या भारतात घडणार्‍या प्रत्येक घटनेविषयी कमालीच्या अलर्ट आहेत. त्या दरदिवशी आपला कारभार आजारी असतानाही सांभाळत आहेत. तामीळनाडूतल्या एका श्रमिकाची बातमी भारतातील सर्व भाषिक दैनिकात प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत स्वराज यांनी जगन्नाथ यांना भारतात परत आणण्याची सर्वतोपरी मदत करण्याची जाहीर केले आहे. भारतात परतण्यासाठी गेल्या अडीच वर्षांपासून 1 हजार किलोमीटरची पायपीट करणार्‍या जगन्नाथन सेल्वराजन यांच्या मेहनतीला यश आले आहेत. परराष्ट्रमंत्री त्यांना मायदेशी परत आणणार आहे. स्वराज यांनी सकाळी आपल्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

कोण आहेत जगन्नाथन सेल्वराजन
जगन्नाथन सेल्वाराजन दुबईत कामानिमित्त गेले होते. त्यांच्या आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. यासाठी त्यांना भारतात परतायचे होते. परंतु, दुबईच्या श्रमिक कामगार न्यायालयाने त्यांना भारतात जाण्याची परवानगी नाकारली. सेल्वाराजन हे 48 वर्षांचे असून तामिळनाडूमधल्या तिरुचिरापल्लीचे येथील ते निवासी आहेत. गेल्या दोन वर्षांपासून न्यायालयात हा खटला सुरू आहे. ते दुबईतल्या सोनापूर येथे राहतात. या भागातून त्यांना दरवेळी दुसर्‍या जिल्ह्यात असणार्‍या न्यायालयात पायी चालत जावे लागते. त्यांच्या राहत्या घरापासून ही जागा 54 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे, ते दरदिवशी पाच तास पायी प्रवास करून न्यायालयात सुनावणीसाठी हजेरी लावतात. त्यांना महिन्यातून किमान दोनदा तरी या ठिकाणी फक्त 20 मिनिटांसाठी हजेरी लावाली लागते. यासाठी ते पहाटे चार वाजता घरातून निघतात. बसचे भाडे देण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नाहीत. त्यामुळे वाळवंटातून चालत या ठिकाणी ते येतात. पैसे नसल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते दुबईतल्या एका सार्वजनिक पार्कमध्ये राहत असल्याची बातमी दुबईतल्या खलिज टाइम्सने जगासमोर आणली होती.

घेतली गंभीर दखल
त्यानंतर भारतातल्या अनेक वृत्तपत्रांनी त्याची बातमी जगासमोर आणली. जगन्नाथनच्या त्रासाची दखल स्वराज यांनी घेतली असून त्यांना लवकरच भारतात आणले जाईल, असे स्वराज यांनी ट्विट करत सांगितले. मंगळवारी सकाळी त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सुषमा स्वराज यांनी दुबईमध्ये असणार्‍या भारतीय दूतावासाला फोन करून या संपूर्ण प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले होते. त्यामुळे लवकरच सेल्वराजन हे भारतात आपल्या गावी परतणार आहेत.