सेवलीच्या दंगलीत 21 जण ठरले दोषी

0

जालना- सेवली येथे उसळलेल्या दंगल प्रकरणात 21 जणांवर दोष सिद्ध झाले असून येत्या सोमवारी त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. कोसमकर यांच्या कोर्टात गुरुवारी याप्रकरणी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. यात सरकार पक्षातर्फे नमूद आरोपींना 10 वर्षे जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली. यावेळी न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

3 एप्रिल 2008 रोजी सायंकाळी सेवली येथे एका पानटपरीवर बनायेंगे मंदिर… हे गाणे लावल्यावरून किरकोळ वाद झाला होता. या वादाचे रूपांतर दंगलीत होऊन दगडफेकीत अनेकजण गंभीर जखमी झाले. सार्वजनिक व खासगी मालमत्तेचेही नुकसान झाले होते. सेवली दंगलीचे पडसाद राज्यभर उमटल्यावर याठिकाणी संचारबंदी करण्यात आली होती. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या बळीराम जाधव व संतोष जवळकर यांचा काही दिवसांनी मृत्यू झालेला आहे. याप्रकरणी 4 एप्रिल 2008 रोजी वहीदखां पठाणसह इतरांविरुद्ध मंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात 30 जून 2008 रोजी तपास अधिकार्‍यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाने या प्रकरणात सरकारपक्षातर्फे एकूण 32 साक्षीदार तपासले तर आरोपीतर्फेसुद्धा एका पोलिस निरीक्षकाचा जबाब नोंदवण्यात आला. विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्त: प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यात शासनाने विशेष सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. संजीव देशपांडे यांची नियुक्ती केलेली आहे. दरम्यान, गुरुवारी अ‍ॅड. देशपांडे यांनी सदरील प्रकरणात 302, 436 या कलमांसह 149 कलम समाविष्ट करून सर्व 21 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, अ‍ॅड. संदीप घुगे यांनी सहकार्य केले.