सेवानिवृत्तीच्या दिनीच कर्मचार्‍यांना ‘पेन्शन पे ऑर्डर’

0

डीआरएम यादव यांच्या प्रणालीने भारावले कर्मचारी

भुसावळ । प्रतिनिधी । रेल्वे प्रशासनात सेवा केल्यानंतर पेन्शन पे ऑर्डरसाठी तब्बल सहा महिने रेल्वेचे उंबरठे झिजवणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांना डीआरएम आर.के.यादव यांनी दिलासा देत सेवानिवृत्तीच्या दिनीच पीपीओ (पेन्शन पे ऑर्डर) प्रदान करून मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी भुसावळ विभागातील रेल्वेत काम करणार्‍या विविध विभागातील ३२ कर्मचार्‍यांच्या थेट बँक खात्यात सेवनिवृत्तीची रक्कम (एनएफटी) जमा करून त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आल्याने सर्व कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबिय भारावले आहेत.

पहिलाच प्रयोग

भुसावळ विभागाचे रेल्वेचे डीआरएम आर.के.यादव यांनी कार्मिक व लेखा विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांची मदत घेत गुरुवारी भुसावळ विभागातील सेवानिवृत्त झालेल्या तब्बल ३२ कर्मचार्‍यांच्या बँक खाती त्यांच्या हक्काची पेन्शनची रक्कम जमा केल्याने भुसावळ विभागात हा अभिनव व पहिलाच प्रयोग राबवला गेल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीदेखील काही कर्मचार्‍यांना अशा पद्धत्तीने रक्कम अदा करण्यात आल्याचे रेल्वेच्या खात्रीशीर सूत्रांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. मात्र सर्वांना एकत्रीतपणे सत्कार करून याला नवीन आयाम देण्यात आला

या कर्मचार्‍यांना मिळाला निरोप

मँगो मोरे, दत्तात्रय लक्ष्मण, विलास बंध्रू, जगन्नाथ बागुल, मिलिंद ठोसरे, जगदीश बोरसे, गणेश रामा, निर्मल भगवानदिन, मधुकर एकनाथ, शेख फरीद शेख असगर, मो.इलियास नसीर खान, सावकाश केदारे, शरद भावसार, रमेश इंगळे, रामदास विश्‍वनाथ, अरुण अडकर, आशाबाई शिंदे, मो.खालीद मो.हनीफ, महेंद्र यादव, रमेश भंगाळे, अब्बास खान कादरखान, संभाजी जाधव, नेल्सन मार्जन, प्रकाश वसंतराव, सुरेश भिकाजी, हरी नेहते, नारायण रामजी, नारायण वलूकर, रामप्रकाश सीताराम, अशोक दामोदर, चंद्रकांत पाटील, सुरेश काळे या ३२ कर्मचार्‍यांना रेल्वे प्रशासनातर्फे निरोप देण्यात आला. रेल्वेच्या खलाशी, टेक्नीशीयन, कारपेंटर, एमसीएम, एईएसएम, लाईनमन यासह विविध विभागातील कर्मचार्‍यांचा त्यात समावेश आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप
आयुष्यभर रेल्वेत कष्टाचे चीज करीत सेवा बजावणार्‍या ३२ कर्मचार्‍यांना गुरुवारी रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात डीआरएम आर.के.यादव यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. प्रसंगी डीपीओ एन.एस.काझी, एपीओ आर.एन.गेडाम, लेखाधिकारी अर्पित गुळवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक डीपीओ एन.एस.काझी तर सूत्रसंचालन व्ही.एस.वडनेरे यांनी केले. कर्मचार्यांच्या बँक खात्यात सेवानिवृत्तीच्या दिनीच कर्मचार्‍यांच्या हक्काची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती डीआरएम आर.के.यादव यांनी दिली.