लोणावळा : सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याचा उत्तरार्ध असतो, असे मानून अनेक जण घरी बसून राहणे पसंत करतात. मात्र, सेवानिवृत्ती म्हणजे नवनवीन गोष्टींची माहिती मिळवून घेण्यासाठीचा उत्तम काळ असतो. या काळात कामाचे किंवा जबाबदारीचे कोणतेही दडपण नसते. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर विविध देशांची भ्रमंती करून विविध गोष्टींची माहिती मिळवावी, असे प्रतिपादन मुख्याध्यापक प्रकाश सरवदे यांनी केले. प्रसारिणी सभेच्या श्रीमती शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालयाचे पर्यवेक्षक संजीव वाघ हे 30 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात मुख्याध्यापक सरवदे बोलत होते.
वाघ यांचा सपत्नीक सत्कार
या कार्यक्रमात संजीव वाघ यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र, भेटवस्तू देऊन तसेच पुणेरी पगडी घालून मुख्याध्यापक प्रकाश सरवदे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन शिक्षक योगेश कोठावदे यांनी केले. अनेक वक्त्यांनी आपल्या मनोगतातून वाघ यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. ढिले, मकरंद गुर्जर, मुंडलिक, कल्पना पवार, बारगजे यांनी मनोगते व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र केदारी, सहसचिव सुभाष आंबेकर, भाजेच्या सरपंच शिल्पा दळवी, संतोष दळवी, व्यंकटेश राठोड, अरविंद मुंडलिक, हरिभाऊ कुलकर्णी, शिक्षक प्रतिनिधी रोहिदास डिकोळे, शिक्षकेतर प्रतिनिधी तानाजी यादव यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र होले यांनी केले.