सेवानिवृत्तीपूर्वीच राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात

0

नाशिक एसीबीची धुळ्यात कारवाई ; चार हजारांची लाच घेताना लिपिकासह दोघांना अटक

धुळे- बियर शॉपीच्या नूतनीकरणासाठी धुळ्यातील कामकाज पूर्ण करून देण्याच्या मागणीसाठी चार हजारांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक धनंजय मून व लिपिक अहिरे यांना गुरूवारी कार्यालयातच रंगेहाथ अटक करण्यात आली. विशेष म्हणजे मून हे 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार होते मात्र तत्पूर्वीच त्यांच्या एसीबीने मुसक्या आवळल्या. मून यांच्या जळगावातील तर अहिरे यांच्या धुळ्यातील घराची पथकाने झडती घेतली मात्र त्यात फारसे काही आढळले नसल्याचे समजते.

नाशिकच्या पथकाची धुळ्यात कारवाई
धुळ्यातील 51 वर्षीय बियर बारच्या चालकाने या संदर्भात नाशिक एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. अधीक्षक मून यांनी धुळे कार्यालयातील बियर शॉपी नूतनीकरणाचे कामकाज पूर्ण करून देण्यासाठी चार हजार लाचेची मागणी लिपिकाद्वारे केली होती तर तक्रारदाराने नाशिकमध्ये तक्रार नोंदवल्यानंतर गुरुवारी सापळा रचण्यात आला. दुपारी चार वाजेच्या सुमारास स्वतः मून यांना धुळे शहरातील जिजामाता विद्यालयाजवळील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातच लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई नाशिक एसीबीचे निरीक्षक प्रभाकर निकम व सहकार्‍यांनी केली.