अयोध्यानगर परिसरात सलग दुसर्या दिवशी घरफोडी ; 51 हजार रोख, 16 तोळे सोन्याचे दागिण्यांचा समावेश ; चोरट्यांनी घरात पलंगासह भिंतीवर पुड्या खावून थुंकले
जळगाव – कमेरचा त्रास असल्याने त्यावर उपचारासाठी नाशिक येथे गेलेल्या दाम्पत्यांचे घर फोडून 16 तोळे, दागिणे व 51 हजार रुपये रोख असा 5 ते साडेपाच लाखांचा एैवज लांबविल्याची घटना अयोध्यानगरातील सतगुरु नगरात समोर आली आहे. दरम्यान चोरट्यांनी जे घर फोडले ते अक्कलकुवा येथे पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत होते, मे महिन्यातच ते पदावरुन निवृत्त झाले आहेत. पोलीस अधीकार्यांचे घर सुरक्षित नसल्याने, सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न अनुत्तरीत आहे. गुरुवारी सलग चार ठिकाणी चोरीची घटना ताज्या असताना दुसर्याच दिवशीच्या या घटनेने जळगाव शहर चोरट्यांच्या ताब्यात काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
शहरातील अयोध्यानगर परिसरातील सतगुरु नगर येथील प्लॉट नं 19 मध्ये सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रकाश नामदेव मेढे, पत्नी प्रभावतीसह सह वास्तव्यास आहे. त्यांची मुलगी प्रणाली हिचा विवाह झाला असून ते मुंबईला नांदते. प्रकाश मेढे कमरेच्या त्रासाने ग्रस्त आहेत. त्यावर उपचारासासाठी मेढे पत्नी प्रभावतीसह नाशिक येथील खाजगी रुग्णालयात गेले होते.
सफाई करणार्या महिलेमुळे प्रकार उघड
मेढे यांच्याकडे साफसफाईसाठी महिला येत असते. मेढे कुटुंब गावाला असल्याने ते दोन ते दिवसात एकदा अशा पध्दतीने घराबाहेर साफसफाई करत असते. शुक्रवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास महिला स्वच्छेतेसाठी आली असताना, तिला लोखंडी तसेच लाकडी अशा दोन्ही दरवाजांचे कुलूप तुटलेले दिसले. तिने याबाबत शेजारी राहत असलेल्या मेढे यांचे लहान भाऊ प्रमोद यांना प्रकार कळविला. प्रमोद मेढे यांनी भाऊ विनोद यांना फोनवरुन प्रकार कळविला. दोघांनी घरात प्रवेश करुन पाहणी केली असता, घरातील बेडरुमधील दोन्ही लोखंडी कपाट फोडलेले होते. तर त्यातील पर्ससह ड्राव्हर, कपडे असा सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. त्यांनी तत्काळ मोठे भाऊ प्रकाश मेढे यांना फोनवरुन प्रकार कळविला. माहिती मिळताच चारचाकीने दाम्पत्य सकाळी 8.30 वाजता जळगावात पोहचले.
साड्यांसह गीफ्ट मिळालेले नवीन घड्याळही लांबविले
51 हजार रुपये रोख, चांदीची समई 200 ग्रॅम, दोन तोळ्याच्या सोन्याच्या प्रत्येकी दोन अंगठ्या, तीन तोळे सोन्याचे मंगळसूत्र, 5 ग्रॅमच्या लेडीज प्रत्येकी दोन अंगठ्या, चांदीच्या 2 ग्रॅमच्या तोडल्या, दोन तोळ्याची चैन, तीन तोळ्याच्या दोन बांगड्या, 7 ग्रॅमचे कानातले, चादीची कुमरी, चांदीची अंतरदानी असा 5 ते साडेपाच लाखांचा एैवज लांबविला. तसेच 31 मे रोजी मेढे सेवानिवृत्त झाले. त्याच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्या पत्नीला नवीन साड्या भेट म्हणून मिळाल्या होत्या, तसेच मेढे यांना टायटन कंपनीचे महागडे नवीन घड्याळ सप्रेम भेट म्हणून मिळाले होते. साड्यांसह घड्याळही चोरटे सोबत घेवून गेले. दरम्यान तक्रारीसाठी मेढे यांचे लहान भाऊ प्रमोद व विनोद गेले असता, त्यांना पोलिसांनी सायंकाळी 4 वाजता तक्रार नोंदविली जाईल, तसेच दागिण्यांचे फोटो अथवा पावत्या लागतील, असे सांगितले. पोलीस अधिकार्यांच्या घरी चोरी झाल्यानंतर त्यांना अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांचे काय? या शब्दात सेवानिवृत्त मेढे यांनी पाहणीसाठी घटनास्थळावर आलेल्या पोलीस कर्मचार्यांजवळ व्यक्त केला. यानंतर दुपारी 3 वाजेच्या सुमारास कर्मचारी कुटुंबियांना सोबत घेवून पोलीस ठाण्यात गेल्यावर गुन्हा दाखल करुन घेण्यात आला.
चोरट्याची एकच टोळी करतेय चोर्या
मेढे यांच्या घरात चोरीदरम्यान चोरट्याने बेसिंग तसेच पलंगावर विमलची पुडी खावून थुंकलेले होते. तसेच बाहेरील भिंतीवर थुंकलेले दिसून आले. दरम्यान काही दिवसांपूर्वी सिंधी कॉलनी तसेच संभाजी नगरात अॅड. हरि सपकाळे यांच्याकडेही घरफोडी झाली. याठिकाणी चोरट्यांनी घरात विमलची पुडी खावून थुंकून घर अस्वच्छ केले होते. फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने या थुंकीचे परिक्षण केले असता, यापूर्वीच्या व आताच्या थुंकलेले हे एकाच व्यक्तीचे असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. त्यावरुन विमलच्या पुड्या खावून थुंकून चोरी करणारी एकच टोळी शहरात सक्रीय असून याच टोळीव्दारे घरफोड्या केल्या जात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मेढे यांच्या घरात आढळून चादरीवरील थुंकल्यानुसार याठिकाणी तीन ते चार दिवसांपूर्वीच चोरी झाल्याची शक्यता फॉरेन्सिकच्या पथकाने व्यक्त केली. दरम्यान श्वान पथकासह, ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वानाने काही भागापर्यंत माग दाखविला. दरम्यान पोलिसांनी या परिसरातील प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेर्यांचे दोन ते तीन दिवसांचे फुटेज ताब्यात घेतले आहे.
अशोक नगरातही चोरीचा प्रयत्न
सद्गुरू नगरातील प्रकाश मेढे यांच्या घराच्या काही अंतरावर असलेल्या अशोक नगरातील आशाबाई शशिकांत भामरे यांच्या घरात सुध्दा चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला़ या घरात काहीही मिळून न आल्यामुळे चोरट्यांना खाली हात परतावे लागले़ आशाबाई भामरे यांच्या पतीचे दीड महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यांना कडू घास काढण्यासाठी बाहेर काढल्याने त्यासाठी त्या बुधवारी पाचोर्याला गेल्या होत्या़ त्यामुळे घरी कुणीही नव्हते़ हीच संधी साधत चोरट्यांनी लोखंडी व लाकडी दरवाजाचे कुलूप तोडले. शुक्रवारी सकाळी शेजारी राहणार्या महिला यांना घराचा दरवाजा उघडा दिसला़ त्यांनी त्वरित आशाबाई यांच्याशी संपर्क साधला व घटनेची माहिती दिली़ त्यामुळे भामरे या शुक्रवारी सकाळी 11 वाजता राहत्या घरी पोहोचल्या़ यावेळी त्यांना मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले़ मात्र, घरात काहीही नसल्यामुळे कुठलीही वस्तू चोरीला गेली नसल्याचे सांगितले.