सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून ५० हजारांचा ऐवज लंपास

0

अमळनेर- शहरातील धुळे रोड वरील सिद्धिविनायक कॉलनीतील एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे पन्नास हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी पसार होताना कोणाला संशय नको म्हणुन या घराला दुसरे कुलूप ठोकले.
याबाबत अधिक असे की न.प. माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वास आत्माराम पाटील हे दि. ५ जून रोजी महिन्याभरासाठी पुणे येथे आपल्या मुलाकडे गेले होते. या दरम्यान त्यांचे अमळनेरातील घर बंद असल्याने अज्ञात चोरट्याने संधी साधत घराचे कुलूप व कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील २० हजार किमतीचा तोशिबा कंपनीचा एलईडी टीव्ही, ५० ग्रॅम चांदीचे शिक्के, ३ चांदीचे देव, एक ग्रॅम सोन्याचे मणी व नाकातील फुली, २१ हजार रुपये रोख व संसारोपयोगी भांडी असा एकूण पन्नास हजारांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी जाताना कुणाला संशय नको म्हणुन घराला दुसरे कुलूप लावल्याने संबंधित चोरटे किमान दोन तीनदा या घरात आले असावेत असा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान मुख्याध्यापक पाटील हे एक महिन्यानंतर दि. ६ जुलै रोजी घरी परतले असता घराचे कुलूप बदललेले दिसल्याने ही घटना उघडकीस आली. याबाबत त्यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे.कॉ. राजेश चव्हाण हे करीत आहेत.