धुळे । औषध निर्मिती क्षेत्रातील जगविख्यात लुपीन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष व सेवाव्रती डॉ. देशबंधू प्यारेलाल गुप्ता (वय 80) यांचे जुहू (मुंबई) येथील निवासस्थानी रविवारी (ता. 25) पहाटे दोनला निधन झाले. ते शुक्रवारी नियमितपणे कामकाज व्यस्त होते. त्यांचे ह्रदयविकाराने निधन झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे देशबंधू गुप्ता यांनी व्यक्तिगत उत्पन्नातून धुळे जिल्ह्यात सिंचन, शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्यविकास, पशुसंवर्धन, महिला सक्षमीकरण यासह विकासाच्या विविध क्षेत्रातील दारिद्ररेषेखालील घटकांच्या उन्नतीसाठी भरीव निधी दिला. त्यातून या जिल्ह्यात परिवर्तनही घडू लागले आहे. दत्तक गावांमध्ये आर्थिक, सामाजिक प्रगतीसाठी मोठे कार्य उभे केले जात आहे. देशप्रेमामुळेच त्यांचे नाव आईवडिलांनी देशबंधू, तर दुसर्या मुलाचे नाव विश्वबंधू ठेवले. देशबंधू गुप्ता यांचा मुलगा नीलेश हे लुपीन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, तर कन्या विनिता या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
पंधराशेहून अधिक गावे दत्तक
लुपीन कंपनीचे देशात 12, तर विदेशात 8 ठिकाणी प्रकल्प आहेत. सर्व प्रकारची औषधे तयार करतांना क्षयरोगासंबंधी औषध निर्मितीत ही कंपनी विश्वात पहिल्या क्रमांकाची ठरल्याचे मानली जाते. हजारो हातांना काम देणार्या या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे 48 हजार कोटी रुपये आहे. राजगड (जि. अल्वर, राजस्थान) येथील देशबंधू गुप्ता यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केल्यानंतर राजस्थानमधील बिट आयआयटीमध्ये अध्यापनास सुरवात केली. त्यांनी औषध निर्मिती क्षेत्रात पाय रोवले. त्याचबरोबर लुपीन फाउंडेशन, देशबंधू ऍण्ड मंजू गुप्ता फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थांव्दारे परिवर्तनासह ग्रामीण विकासासाठी चेंज इंडिया प्रोग्रॅम’ हाती घेत देशबंधू गुप्ता यांनी देशात नऊ राज्यातील साडेतीन हजार, तर महाराष्ट्रात सरासरी पंधराशेहून अधिक गावे दत्तक घेतली आहेत. यात धुळे जिल्ह्यातील सहाशे गावांचा समावेश आहे.