चाळीसगाव । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘सेवा दिवस’ चाळीसगाव तालुक्यात आमदार उन्मेशदादा पाटील व भारतीय जनता पक्षाच्या वतीने राबविण्यात आला. यात रविवार 17 रोजी शहरातील राजपूत मंगल कार्यालय येथे सकाळी 9 ते 4 या वेळेत खास कार्यकर्त्यांसाठी ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात’ या विषयावर मार्गदर्शन करणारा तन-मन-धन फौन्डेशन कोर्स जीवन विद्या मिशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. तसेच सदगुरू वामनराव पहेलवान यांचे शिष्य श्री.दशरथ शिरसाठ यांच्या वाणीतून सोने करा आयुष्याचे या विषयावरील भव्य समाज प्रबोधन महोत्सव श्रोत्यांच्या प्रचंड उपस्थितीत पार पडला.
जुनपानी व परिसरातील गावांना गॅस कनेक्शनचे वितरण
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या महिलांसाठीच्या पंतप्रधान उज्वला योजनेंतर्गत वनविभागातर्फे जुनपाणी येथे वनालगतच्या गावातील 228 लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वितरण आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झाले. ज्या गावांनी वनसंरक्षणात चांगल्या रितीने सहभाग घेऊन अवैध वृक्षतोड, वनजमिनीवरील अतिक्रमण, शिकार, वनवा, अवैध चराईला प्रतिबंध केला, त्या गावातील ग्रामस्थांना या गॅस कनेक्शनचे वितरण केले. या योजनेंतर्गत जुनपानी येथील 53, घोडेगाव येथील 134, राजदेहरे (सेटलमेंट) येथील 41 अशा एकूण 228 ग्रामस्थांना लाभ मिळाला. वन टिकले तरच भविष्यात पाणी मिळेल. त्यामुळे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले. वनक्षेत्रपाल संजय मोेरे यांनी या योजनेची माहिती ग्रामस्थांना दिली. इतरही गावातील ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा. हरीत सेनेत सहभागी होऊन शासनाच्या सन 2018 च्या 13 कोटी वृक्ष लागवड योजनेत वृक्षारोपण करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या वेळी उपसभापती संजय पाटील, दिनेश बोरसे, मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, बाळासाहेब राऊत, सरपंच अध्यक्ष आदी उपस्थित होते. यशश्वितेसाठी घोडगाव येथील वनपाल प्रकाश पाटील, जुनपाणी येथील वनरक्षक संजय जाधव, संजय चव्हाण, अजय महिरे, राहुल पाटील, बाळू शितोळे, संजय देवरे, गोरख शेलार आदींनी परिश्रम घेतले.
यांची होती उपस्थिती
सदर महोत्सवप्रसंगी आमदार उन्मेश पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पं.स. सभापती स्मितल दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण, भाजपाचे विस्तारक प्रा.सुतार सर, प्रा.ए.ओ.पाटील, लालचंद बजाज, नगरसेवक नितीन पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, शहराध्यक्ष अक्षय मराठे, सरचिटणीस प्रा.सुनील निकम, अनिल नागरे, अॅड.प्रशांत पालवे, अमोल नानकर यांच्यासह भारतीय जनता पक्ष व जीवन विद्या मिशनचे पदाधिकारी – कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
विकास कामांचे उद्घाटन
गिरणा धरण उभारणीच्या वेळेस स्थलांतरीत झालेले विसापूर गावात तब्बल 50 वर्षानंतर विविध विकासकामांसाठी राज्य शासनातर्फे निधी उपलब्ध झाला असून 56 लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने आमदार उन्मेशदादा पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. 50 वर्षात मुलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या या गावांना राज्यातील सरकारने मदतीचा हात दिल्यामुळे ही गावे इतर गावांच्या बरोबरीने विकास करायला सक्षम होतील असा विश्वास याप्रसंगी आमदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केला.