पुणे । कोंढवा, गंगाधाम, बिबवेवाडीकडे जाणार्या व या भागातून पुणे स्टेशन तसेच हडपसरकडे येणार्या वाहनांसाठी सेव्हन लव्हज चौक ते मार्केटयार्ड सुमारे 1 किलोमीटरचा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या संकल्पित रचनेच शनिवारी झालेल्या महापालिकेच्या एस्टिमेट कमिटी बैठकीत मान्यता देण्यात आली. या पुलामुळे या भागातील वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.
महापालिकेकडून सेव्हन लव्हज चौक ते मार्केटयार्ड (वखारमहामंडळपर्यंत) उभारला जाणारा हा पूलही भविष्यात दुमजली होणार आहे. पालिकेकडून नेहरू रस्त्याच्या काही मार्गावर एचसीएमटीआर रस्ता प्रस्तावित करण्यात आलेला असून या रस्त्याचा विचारही या पुलाच्या रचनेत करण्यात आलेला आहे. त्यानुसार, पुलाचे बांधकाम करतानाच त्याचे खांब हे एचसीएमटीआर रस्त्याच्या रचनेशी सुसंगत असणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी हा नवीन पूल दुमजली असणार आहे. हडपसरकडून मार्केटयार्ड, कोंढवा, बिबवेवाडी, गंगाधाम कात्रजकडे जाणार्या वाहनांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध होणार आहे.
दुमजली पुलाची आखणी
स्वारगेट, पुणे स्टेशन तसेच हडपसरकडून आलेली वाहने मार्केटयार्ड तसेच पुढे गंगाधाम आणि कोंढव्याकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. मात्र, सेव्हन लव्हज चौकापासून पुढे सॅलिसबरी पार्क तसेच पुढे मार्केटकडे जाताना तसेच येताना या रस्त्याचे रुंदीकरण झालेले असले, तरी डायसप्लॉट झोपडपट्टीमुळे हा रस्ता वाहतुकीस अपुरा पडतो. परिणामी, सकाळी-सायंकाळ या रस्त्यावर वाहतूककोंडी होते.