‘सेव्ह आराध्या’च्या निमित्ताने अवयवदानाची अनोखी चळवळ

0

शरीर आणि शरीराला असणारे सर्व व्यवस्थित अवयव ही माझ्यासारख्या अनेक सदृढ माणसांना मिळालेली अनोखी पर्वणी आहे. म्हणजे आपल्या वावरण्यावर शारीरिक कमजोरीमुळे कुठलेही निर्बंध सहजासहजी लागू शकत नाहीत. या सशक्त शरीराचा आपण कसा उपयोग करतो? आणि आपण मेल्यानंतर या शरीराचं काय होणार? या प्रश्‍नावर थोडं येऊन थांबलो, तर नक्कीच समाधानकारक उत्तर माझ्यासमोर तर नाहीये. मात्र, आपल्या अवतीभवती अशी अनेक लोकं फिरत असतात किंवा जगत असतात की ज्यांना जन्मत:च किंवा अपघाताने शरीराचा काही भाग मिळालेलाच नसतो. मग अशी लोकं दिव्यांग, प्रज्ञाचक्षू अशा कॅटेगरीत मोजली जातात. खरंतर अशी लोकं प्रेरणेचे अफाट स्रोत असतात. यांना सहानुभूतीची गरज नसून सहकार्य आणि आपलेपणाच्या भावनेची साद हवीय.

अंधांसाठी फार मोठे काम करणारे ब्रेल मॅन ऑफ इंडिया अशी ओळख असणारे स्वागत थोरात यांनी अंधांसाठी काम सुरू करताना स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून अंधांच्या अडचणी जाणून घेऊन काम सुरू केले. जाणीव अधिक प्रकर्षाने झाल्याने त्यांच्या हातून मोठं काम होऊ शकलं. असंच प्रत्येक अंध-अपंग व्यक्तीबाबत विचार करणं गरजेचे झाले आहे. आपण एखादा शरीराचा भाग थोडा वेळासाठी वापरायचा नाही असं ठरवून काम करून बघा, आपल्याला अडचणी प्रभावाने लक्षात येतील. सध्या ‘सेव्ह आराध्या’ नावाने एक अवयवदानाची मोहीम प्रचंड व्यापक स्वरूपात समोर येतेय. एक मृत व्यक्ती दोन अंधांना डोळस करू शकतो तसेच त्याच्या शरीराचे इतर अवयवदेखील काहींचे जीव वाचवू शकतो, ही अवयवदान मोहिमेमागची मुख्य भावना.

मध्यंतरी एक दोन घटना अवयवदानाच्या चळवळीसाठी फार महत्त्वाच्या घडल्या. नांदेडला दुर्दैवाने अपघाताने ब्रेनडेड झालेल्या एका व्यक्तीचे अवयवदान करण्यासाठी अवघ्या काही तासांमध्ये यंत्रणा फिरली आणि ते मिशन सार्थकी लागले. काही लोकांना याचा फायदा झाला. अनेक ठिकाणच्या बातम्या आजकाल आपण वाचतो की दुर्दैवाने अपघाताने मृत अगदी लहान मुलांचेदेखील अवयवदान करण्यासाठी पालकवर्ग पुढे सरसावतोय. आपल्यावर दुःखाचा पहाड कोसळल्यानंतर खरंतर असे निर्णय घेणे अवघड असते. मात्र, यामुळे आपल्यातून गेलेला आपला व्यक्ती डोळे, हृदय अशा माध्यमातून जिवंत राहते ही भावना वाढीस लागली आहे. ही भावना व्यापक पद्धतीने वाढीस लागतेय आणि लागावी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. आज अनेकजण नेत्रदान, अवयवदानाचे संकल्प करण्यासाठी स्वतःहून पुढे येताहेत हीदेखील सकारात्मक बाब आहे जी या चळवळीला निश्‍चित बळकटी देतेय.

आज खरोखर अवयवदान ही येणार्‍या काळाची मोठी गरज झाली आहे.अपघात तसेच अनेक आजारांमुळे अवयवांचा मोठा तुटवडा या जगात निर्माण झाला आहे. अशाच चार वर्षांच्या चिमुकल्या आराध्याला दुर्धर आजारामुळे हृदयाची गरज आहे.आराध्याला हृदय मिळावे आणि अवयवदानाचा प्रसार व्हावा यासाठी फेसबुक आणि ट्विटरला डर्रींश-रीरवहूर या टॅगखाली मोठ्या प्रमाणात ट्रेंड चालवून अभियान राबवले गेले. याला नेटिझन्सनी अभूतपूर्व प्रतिसाददेखील दिला आहे. वरिष्ठ पत्रकार आणि आरोग्य क्षेत्रात मोठं काम असणारे संतोष आंधळे हे या मोहिमेचे प्रणेते. खेड्यापाड्यातील गरीब व गरजू रुग्णांना हव्या त्या स्वरूपाची मेडिकल सुविधा मोफत किंवा कमीत कमी पैशात मिळावी यासाठी अनेक वर्षांपासून त्यांची धडपड सुरू आहे. पत्रकारितेत दीर्घ काम केल्यानंतर आता त्यांनी पूर्णवेळ स्वतःला आरोग्यसेवेच्या या नव्या चळवळीत झोकून दिलेय. ‘माय मेडिकल मंत्रा’ या अनोख्या वेबसाइटद्वारे त्यांचे काम चालते.

अनेक दिवसांपासून आराध्यामुळे या चार वर्षांच्या मुलीसाठी हृदय मिळावं यासाठी ते गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने धडपड करत आहेत. आराध्याला डायलेटेड कार्डीओ-मायोपॅथी हा आजार आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हार्ट ट्रान्सप्लांट हा एकच यावर मार्ग आहे. आराध्यासाठी डर्रींश-रीरवहूर हा ट्रेंड सोशल मीडियात चालवून अवयवदानाची एक नवी सोशल चळवळ त्यांनी सुरू केली. संतोष दादा म्हणतात की आमचं उद्दिष्ट एकच आहे. आराध्याला हृदय मिळवून द्यायचं. यासाठी आम्ही सर्व सहकारी प्रयत्न करतोय. अवयवदानाची चळवळ व्यापक स्वरूपात राबवणे काळाची गरज असल्याचे ते सांगतात. अवयवदानाच्या या चळवळीबद्दल आणि एकूणच आरोग्यविषयक मोहिमेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी साइटवर जाऊन माहिती अवश्य घ्या. या चळवळीला व्यापक रूप येतेय ही फार आश्‍वासक बाब आहे. यासाठी आपण आपल्यापासून सुरुवात करू. जर असे झाले तर अनेक आराध्यांना नवे जीवन मिळू शकते.
निलेश झालटे