मुंबई – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. सत्ताधारी पक्ष विकासाच्या मुद्द्यावरून तर विरोधक सत्ताधाऱ्यांच्या नाकर्ते पणावरून मत मागत आहे. दरम्यान मोदींनी सैनिकांच्या नावाने मत मागितल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. मोदी सरकार सैन्यदलाचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचे आरोप विरोधकांनी केले असल्याने निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे. दरम्यान माजी सेना प्रमुखासह निवृत्त अधिकाऱ्यांनी याबाबत राष्ट्रपती यांना पत्र लिहले आहे. राजकीय पक्षांकडून सैनिकांचा होणारा राजकीय वापर थांबवण्याची मागणी तीनही सेनेच्या ८ माजी सेनाप्रमुख व १५० पेक्षा जास्त माजी सैन्य अधिकाऱ्यांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून कळवले आहे.
पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांनी आपले मत पुलवमा हल्ल्यात शहिदांच्या समर्थनात करावे असे विधान लातूरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात केल्याने त्यांच्यावर चोहीबाजूने टीका होत आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्या भाषणात सैनिकांचा उल्लेख करण्यास सुरुवात केली. भाजपच्या ‘मै भी चौकीदार” या गीतात सुद्धा सैनिक दाखवण्यात आले होते, याविषयी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केली होती, यावरून भाजपला निवडणूक आयोगाने खुलासा मागितला आहे. निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षांने सैनिकांचे वापर करू नयेत असे निवडणुक आयोगाने आधीच स्पष्ट केले असताना सुद्धा भाजपकडून सैनिकाच्या श्रेय घेण्याच्या प्रयत्न होत असल्याचे आरोप केला आहे. याची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असल्याने भाजपची अडचण वाढू शकते.