सैनिकांच्या पत्नींविषयी केलेले वक्तव्य भोवले

0

मुंबई : भारतीय जनता पार्टी पुरस्कृत विधान परिषदेचे अपक्ष सदस्य प्रशांत परिचारक यांना सोलापूरमध्ये महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारात सैनिकांच्या पत्नींविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल गुरूवारी दीड वर्षांकरीता निलंबित करण्यात आले.

सभागृहाचे नेते व राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. सभागृहाची नियमित बैठक सुरू होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी प्रशांत परिचारक यांच्या आक्षेपार्ह विधानाचा मुद्दा उपस्थित केला. तालिका सभापती किरण पावसकर यांनी हा विषय नंतर घेण्यात येईल, असे सांगताच विरोधी पक्षांचे सदस्य अमरसिंह पंडित, जयदेव गायकवाड, जयवंत जाधव, चंद्रकांत रघुवंशी, निरंजन डावखरे आक्रमक झाले. सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन ते न्याय द्या, न्याय द्या, अशा घोषणा देऊ लागले. जय जवान, जय किसानच्या घोषणाही विरोधक देऊ लागले. तेव्हा तालिका सभापतींनी सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.

कामकाज पुन्हा सुरू होताच पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली. तेव्हा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांना बोलण्याची परवानगी दिली. त्यावेळी पाटील यांनी परिषदेचे सदस्य परिचारक यांच्या दीड वर्षांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. परिचारक यांच्या या कथित आक्षेपार्ह विधानाची चौकशी करण्यासाठी दहा सदस्यांची उच्चाधिकार समितीही त्यांनी जाहीर केली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर या समितीचे अध्यक्ष असतील. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नारायण राणे, सुनील तटकरे, शरद रणपिसे, डॉ. नीलम गोऱ्हे, जयंत पाटील, भाई गिरकर, कपिल पाटील आदींचा या समितीत समावेश आहे. विधिमंडळ सचिव डॉ. अनंत कळसे समितीचे सदस्य सचिव असतील. ही समिती या प्रकरणाची चौकशी करून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापर्यंत आपला अहवाल सभागृहाला सादर करेल. समितीने घेतलेला निर्णय सभागृहाला मान्य असेल, अशा आशयाचा हा प्रस्ताव होता. तो एकमताने मंजूर झाला.