पोलादपूर (शैलेश पालकर)- माजी सैनिक आणि शहिद जवानांच्या कुटूंबियांना सैनिकांकडून झालेल्या सत्कार आणि आपुलकीच्या भावनेने जवळ करण्याच्या वेगवेगळया कार्यक्रमांमुळेच एकटेपणाची भावना दूर होऊन जगण्याचे बळ मिळते, असे भावनिक उद् गार कारगिल शहिद लक्ष्मण निकम यांच्या पत्नी संगिता निकम यांनी व्यक्त केले.
बुधवारी साईनाथ मंदिराच्या सभागृहात पोलादपूर तालुका माजी सैनिक संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कारगिल विजय दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपत जगदाळे, उपाध्यक्ष नामदेव उतेकर,सचिव सुभेदार परशुराम दरेकर, कॅप्टन विष्णू सावंत, वसंत नलावडे, सुभेदार गणपत निकम, मधुकर शिंदे, रामचंद्र नरे मान्यवर उपस्थित होते. यावेळी कारगिल युध्दातील शहिदाची पत्नी श्रीमती संगीता निकम यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी दीपप्रज्वलन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन तसेच विविध युध्दात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. 1999 साली पाकिस्तानजवळ झालेल्या कारगिल युध्दात मिळालेल्या अभूतपूर्व विजयाची स्मृती म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो, अशी माहिती यावेळी देऊन पोलादपूर तालुक्याच्या शहिद परंपरेला अभिमानास्पद असे हे युध्द ठरल्याची माहिती माजी सैनिक संघटनेचे सचिव सुभेदार परशुराम दरेकर यांनी दिली. यावेळी कारगिल युध्दात सहभागी झालेल्या निवृत्त सुभेदार व जवानांनी आपले अनुभव कथन केले.
महाड येथील सीएसडी कॅन्टीन सुरू करणे, पोलादपूर येथे शाहिद स्मारकासाठी जागा मिळण्याबाबत चर्चा व पाठपुरावा करण्याचे माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन श्रीपत जगदाळे यांच्या अध्यक्षतेखालील चर्चा सत्रात ठरविण्यात आले. या कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमप्रसंगी पोलादपूर तालुक्यातील अनेक माजी सैनिक व माजी सैनिकांच्या तसेच शहिदांच्या विधवा पत्नी उपस्थित होत्या.