पुणे । स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण करणार्या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून पहिल्या टप्प्यातील सुमारे 100 किलो तिळगूळ देशाच्या सरहद्दीवरील सैनिकांना पाठविण्यात आला. ‘भारत माता की जय…’ अशा घोषणा देऊन सैनिकांप्रती असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करीत तिळगूळाचे पूजन करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमात 25 मंडळांनी सहभाग घेत हा आपुलकीचा ठेवा सैनिकांपर्यंत पोहोचवून देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीवच जणू पुणेकरांना करून दिली.
देशात जातींवरून भांडणे होत असल्याचे वाईट
अॅड. गायत्री खडके म्हणाल्या, सध्या जातीपातींवरून समाजात जे वाद होताना दिसत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आपल्या देशासाठी लढणार्या सैनिकांनी कधीही जातपात मानली नाही. परंतु त्यांना जेव्हा कळेल की आपल्या देशात जातींवरून भांडणे होत आहेत तेव्हा त्यांना खूप वाईट वाटेल. सैनिकांना तिळगूळ पाठविले जात आहेत. त्याबरोबच त्यांना आम्ही जातपात न मानता भारतीय म्हणून एकजूटीने राहू, असा विश्वास देणे गरजेचे आहे.
सार्वजनिक मंडळांचा सक्रीय सहभाग
शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सैनिक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका अॅड. गायत्री खडके, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. बिपीन पाटोळे, शाहीर हेमंतराजे मावळे, मेहुणपुरा मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे, वीरपत्नी दीपाली मोरे, स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष मदनसिंह राजपूत उपस्थित होते. स्टेशनरी कटलरी अॅन्ड जनरल मर्चंट असोसिएशन पुणे, संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नेने घाट गणेशोत्सव मंडळ, कडबे आळी गणेशोत्सव मंडळ, हसबनीस बखळ मित्र मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, त्वष्टा कासार मंडळ आणि इतर सार्वजनिक मंडळांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घेतला.
‘तिळगूळ घ्या…’
मावळे म्हणाले, आपण सैनिकांना तिळगूळ पाठवतो त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला असणार्या लोकांना देखील ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ असे सांगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण आपल्याच देशात धर्मासाठी, जातीसाठी लढत असू तर देशाच्या सीमेवर सैनिकांनी लढून काय फायदा होईल. ते देशाच्या सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. ही भावना सदैव आपल्या मनात असणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. गिरीश सरदेशपांडे, महेश काटदरे, नितीन पंडीत, अजित परांजपे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. आनंद सराफ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.