सैनिकी शिक्षण काळाची गरज

0

सैनिकी शिक्षण ही बाब केवळ अभ्यासक्रमापुरती मर्यादित नाही, तर नागरी व सैन्य दलात कार्य करताना व्यक्तिमत्त्व विकास घडवण्याची आणि करिअर करण्याची बाब आहे. रोजच्या अभ्यासक्रमाबरोबरच खेळ, शिस्त तसेच चौफेर ज्ञानाचा अनुभव त्यातून मिळत असतो. या सैनिकी शिक्षणाचे महत्त्व स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ओळखले होते. देशहितासाठी त्यांनी लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या, असा संदेश साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून दिला होता. त्यामागे राष्ट्रभक्तीबरोबरच एक उत्तम व्यक्तिमत्त्व असलेली पिढी घडवण्याचा त्यांचा हेतू होता. सैनिकी शिक्षण हे शत्रूशी लढा देण्याइतकेच जितके महत्त्वाचे आहे तितके नागरी जीवनात वावरताना तसेच देशाची सेवा करताना अत्यंत आवश्यक आहे. हाच दृष्टिकोन ठेवत गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ सातत्याने सैनिकी शिक्षणासाठी व्रतस्थाप्रमाणे महाराष्ट्र मिलिटरी स्कूल ही मुलांसाठी निवासी शाळा कार्यरत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीच्या माध्यमातून ही शाळा सुरू असून, सैनिकीकरण व विज्ञानवाद या तत्त्वावर या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते.

तळवली, टोकावडे (मुरबाड) परिसरात निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या शाळेत केवळ मुलांनाच इंग्रजी माध्यमातून निवासी प्रशिक्षण दिले जाते. पाचवी ते दहावीपर्यंत ही शाळा असून शालेय अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच सैनिकी प्रशिक्षण, स्वसंरक्षण, रायफल शूटिंग, साहसी खेळ, कराटे, मुष्टियुद्ध आदी विविध स्वरूपाचे ज्ञान प्रात्याक्षिकांसह विद्यार्थ्यांना दिले जाते. हॉकीच्या खेळासाठी या ठिकाणी राष्ट्रीयस्तरावरील मैदानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे हे मैदान हे विविध स्पर्धांसाठी एक फार मोठे आकर्षण ठरलेले आहे. या ठिकाणच्या अनेक विद्यार्थ्यांना मुष्टियुद्ध व हॉकी या खेळांमध्ये राष्ट्रीयस्तरावर चमकदार कामगिरी केलेली आहे. त्याचबरोबर यंदापासून पहिल्यांदाच राज्यात डिजिटल वर्गांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा उपक्रम संस्थेच्या वतीने राबवण्यात येत आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू व संस्थेचे संचालक रणजित सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार चालू आहे. वेगवेगळ्या संकल्पना तसेच नवे प्रयोग सातत्याने या ठिकाणी करत विद्यार्थ्यांमधील व्यक्तित्त्वाचा सर्वांगीण विकासाचे कार्य नेटकेपणाने करण्यात येते. विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यात वैयक्तिकपणे लक्ष देऊन त्याला अनुकूल असा वाव दिला जातो. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांकडून सातत्याने मार्गदर्शन केले जाते. निवृत्त लष्करी अधिकारीदेखील नियमितपणे या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना विविध तंत्र शिकवत असतात. केवळ मुंबई, ठाणे किंवा महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून या ठिकाणी विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. महाष्ट्रातील सैनिकी शाळांमध्ये महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे स्थान अव्वल आहे. संस्थेच्या वतीने यंदापासून नव्याने प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. केवळ पाचवीपासूनच नव्हे, तर दहावीपर्यंत अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेऊ इच्छिणार्‍यांना त्याचा लाभ घेता येऊ शकेल.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे नेहमीच देशहितासाठी उपयोगी राहिलेले आहेत. सैनिकीकरण हा त्यांचा विचार हा राष्ट्रहितासाठी तसेच देशाच्या अखंडता व सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळेच देशात सैनिकी प्रशिक्षण देणार्‍या संस्थांची वाढ झाली पाहिजे. त्याला शासकीय स्तरावरूनदेखील उत्तम सहकार्य तसेच प्रोत्साहन मिळाले पाहिजे. एक सामाजिक कर्तव्य तसेच राष्ट्रीय भावनेतून हे कार्य झाले पाहिजे, तरच देश अधिकाधिक बळकट होऊ शकेल, प्रत्येकाने आपल्या स्तरावरदेखील त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची गरज आहे. शिक्षण संस्थांची निर्मिती करताना जाणीवपूर्वक तसेच प्रयत्न करण्यावरदेखील तज्ज्ञांनी भर दिला पाहिजे, असे रणजित सावरकर यांना वाटते.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना प्रखर होण्याबरोबरच त्यांच्यात सनदी अधिकारी किंवा सामाजिक नेतृत्व करण्याचे कौशल्य वाढले पाहिजे. चारित्र्यवान देशभक्तांची निर्मिती झाली पाहिजे. या हेतूने कार्य झाले तरच भारताची सक्षम पिढी जगात महासत्ता होताना निर्माण होऊ शकते. त्यासाठी आतापासूनच प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे, या जाणीवेतून बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरीचा त्याग करत रणजित सावरकर यांनी पूर्णवेळ या कार्याला वाहून घेतले आहे.
अशोक शिंदे