मनीला (फिलिपाइन्स)। देशाच्या प्रमुखपदावर बसणार्या व्यक्तीने अत्यंत तोलून मापून बोलावे अशी अपेक्षा. पण, त्या प्रमुखपदावर असणारी व्यक्ती जर डोक्याने सनकी असेल तर, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार. फिलिपिन्स देशाच्या राष्ट्रपतींबाबतही असेच घडले आहे. फिलिपाइन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी महिलांबद्दल बोलताना असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्याचा जगभरातून निषेध केला जात आहे. सैनिक तीन महिलांवर बलात्कार करू शकतात, असे वादग्रस्त वक्तव्य करून रॉड्रिगो यांनी खळबळ उडवून दिली आहे.
रॉड्रिगो यांच्या विधानानंतर जगभर संतापाची लाट निर्माण झाली असून, त्यांनी असे वक्तव्य करून सैनिकांना उसकवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप महिला संघटनांनी केला आहे. सैन्यदलातील जवानांशी संवाद साधताना रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी शुक्रवारी हे वादग्रस्त वक्तव्य केले. सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाषणादरम्यान, रॉड्रिगो यांची जीभ आणि भाषणाचा स्तर दोन्ही घसरले. या वेळी बोलताना रॉड्रिगो सैनिकांना उद्देशून म्हणाले, ‘तुम्हाला मार्शल लॉचा वापर करण्याची मुभा आहे. तुम्ही या अधिकाराचा वापर करा. तुमच्यावर कारवाईची वेळ आली तर तुमच्याऐवजी मी शिक्षा भोगेन तसेच तुम्ही तीन महिलांवर बलात्कार केले, तर त्याची जबाबदारी माझी असेल. मी तुमच्यासाठी तुरुंगातही जाईन’ असे बेताल वक्तव्य करून रॉड्रिगो यांनी खळबळ उडवून दिली.
रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी मागील आठवड्यापासून फिलिपाइन्समधील मारावी या शहरात दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी मार्शल लॉ लागू केला आहे. सुमारे दोन लाख लोकसंख्या असलेल्या मारवी शहरात लागू केलेला मार्शल लॉ सुमारे 60 दिवस चालणार आहे. या शहरात आयसिस समर्थक दहशतवादी संघटनेचे जाळे आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांशी लढण्यासाठीच ड्युटर्ट यांनी येथे धडक मोहीम राबवली आहे. फिलिपाइन्स सैन्याने दहशदवादी जाळे असणार्या तळांवर हवाई हल्लेही सुरू केले आहे. मार्शल लॉच्या काळात तुम्हाला कोणत्याही घरात घुसून चौकशी करण्याचे अधिकार आहेत असे ड्युटर्ट यांनी सांगितले.