पुणे । सैनिक देशासाठी जात आणि धर्म विसरून लढतात देशातील नागरिकांना ते का जमत नाही? असा सवाल लेप्टनंट कमांडर (निवृत्त) विनायक अभ्यंकर यांनी विचारला महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कै. माधव मदाने स्मृती व्याख्यान गुंफताना ते बोलत होते ‘युद्धस्य कथा रम्य:’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित होते. भारत-पाकिस्तान, भारत-चीन, बरोबरच्या युद्धाच्या रोमहर्षक कथा अभ्यंकर यांच्याकडून ऐकताना श्रोते भारावून गेले.
राज्यकर्त्यांनी टेबलावरील चर्चेत गमावले
अभ्यंकर म्हणाले, मशिवछत्रपती पाठीशी होते म्हणून बाजीप्रभू तानाजी प्राणाची बाजी लावून लढले. राजकीय नेतृत्व जेव्हा सैनिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहते तेव्हा सैनिक प्राणपणाने लढतात. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती जगात सर्वक्षेष्ठ मानली जाते. परदेशातही त्याचा अभ्यास केला जातो. आपल्या देशातही तो होणे गरजेचे आहे. आपल्या देशाचे दुर्दैव असे की सैन्यानी रणांगणात पराक्रम करून जे कमावले ते या देशातील राज्यकर्त्यांनी टेबलावरील चर्चेत गमावले. युद्ध ही देशाला परवडणारी गोष्ट नाही. युद्धमुळे देश पन्नास वर्षे मागे जातो. अक्षर साहित्याची निर्मिती रणांगणावर आणि तुरुंगात झाली आहे गीता रणांगणावर सांगितली गेली आणि श्यामची आई सारखी अजरामर साहित्यकृती साने गुरुजींनी तुरुंगात लिहिली. दीपक करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर कुबेर यांनी सैनिकांना अभिवादन करणारी कविता सादर केली.
आज गझलांची मैफल
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एक कवयित्री एक कवी या कार्यक्रमात प्रसिद्ध गझलकार भूषण कटककर आणि सुप्रिया जाधव सहभागी होणार आहेत. त्यांच्या बरोबरच्या गप्पा आणि गझला ऐकण्याची संधी साहित्य रसिकांना मिळणार आहे. कवी उध्दव कानडे आणि प्रमोद आडकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम गुरुवारी 8 फेब्रुवारी रोजी, सायंकाळी 6.00 वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली.