सैराट चित्रपटात आकर्षणाचे केंद्र ठरलेलं हे सुकलेलं झाड आता पुन्हा फांदी तुटल्याने चर्चेत आले आहे. आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू या झाडाच्या ज्या फांदीवर बसली होती. ती फांदी तुटल्यामुळे प्रेक्षकांनी पुन्हा एकदा त्या झाडाजवळ गर्दी केली असून सोशल मीडियावर याची खंत देखील व्यक्त केली जात आहे. ’सैराट झालं जी’ या गाण्यातला काही भाग करमाळ्यातील या झाडावर चित्रित झाला होता. चित्रपटानंतर हे झाड ’सेल्फी पॉईंट’ झाले.
नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाने मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक रेकॉर्ड ध्वस्त केले आहेत. मराठी सिनेमाने एकंदरीत जी नवी कात टाकली आहे, त्यात सैराटने नवोन्मेष भरला आहे अस म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सैराटच्या निमित्ताने काही वृत्तींनी एकूणच काही समाजावर वाट्टेल त्या टीका केल्या, तर दुसरीकडे सैराटसह नागराज मंजुळेवर टीकेचा अक्षरशा भडीमार केला. असं असतानाही महत्वाचं म्हणजे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशा कहर केला. सिनेमातील प्रत्येक पात्राला नाव आणि नव आयुष्य प्रदान केलं. आर्ची-परश्या अर्थात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू तर हिट झालेच मात्र सिनेमाच्या शेवटी काही मिनिटासाठी आलेला छोटा तात्या इतकंच काय तर सिनेमाच्या प्रत्येक सीनमध्ये 70 एमएमवर झळकलेला प्रत्येक चेहरा सेलिब्रेटी झाला. हे झालं जिवंत माणसांच. मात्र नागराज अण्णांची लीलया इतकी अफाट की त्यांनी सिनेमातील लोकेशनला देखील जिवंतता प्रदान करून टाकली. म्हणूनच की काय गेले दोन दिवस ’सैराट झालं जी’ या गाण्यात केवळ मिनिटभरासाठी दाखवलेल्या त्या अजीर्ण झाडाची तुटलेली फांदी मिडीयात चर्चेत आली आहे.
एकंदरीत सैराटच्या निमित्ताने बर्याच जिवंत-मृत गोष्टींना नवीन पालवी फुटली. नागराज मंजुळे यांच्या सांगण्याचा मतितार्थ बाजूला ठेवून नको-नको त्या मुद्द्यावर सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून अक्षरशा रान पेटले, ती आग अजूनही कायम आहे, भविष्यातही राहील. सैराटचा ट्रेलर आला तेंव्हापासून ’खेळ’ सुरु झाला. ट्रेलर जसा प्रदर्शित झाला तस सोशल माध्यमांवर वादळ उठू लागली. जसजसा विरोध वाढू लागला तसतसा सिनेमाचा गल्ला वाढू लागला. सिनेमा नव-नवे रेकॉर्ड करू लागला. चित्रपटाचे तिकीट न मिळाल्याने तिकीटबारीवर मारामार्या झाल्याच्या घटनाही समोर आल्या. चित्रपटातील एकुनेक कलाकारांना चाहत्यांच्या प्रेमामुळे बाहेर पडणे मुश्कील झाले, अजूनही त्या कलाकारांच्या सार्वजनिक ठिकाणी येण्याने चक्काजाम होतोय. मराठी सिनेमाच्याच नव्हे तर भारतात कुठल्याही प्रादेशिक सिनेमाच्या इतिहासात सैराटने मैलाचा दगड रोवला. या ’फांदीच्या’ निमित्ताने 100 कोटीच्या वर उत्पन्न मिळवणारा सैराट ’राजकारण’ होऊनही अद्याप मनावर कब्जा करून बसलेला दिसून येतोय.
चला आता हेडिंगच्या मुख्य विषयावर येऊ. या चित्रपटातील आर्ची परश्या बसलेल्या वाळलेल्या झाडाची चर्चा खूपच चवीने सोशल मीडियावर रंगू लागली आहे. तस तर सैराट सिनेमानंतर करमाळा परिसर, कमलाई देवीचे मंदिर, उजनी धरण, वाडा, आर्चीचं घर, मुंबईची झोपडपट्टीतील ती झोपडी आणि संबंधित सगळेच लोकेशन्स ही पर्यटनस्थळे बनली आहेत. लोकं दुरून-दुरून येऊन या ठिकाणांना भेटी देऊन इथल्या सेल्फी सोशल माध्यमांवर पोस्टत आहेत. या चित्रपटात आकर्षणाचे केंद्र ठरलेलं हे सुकलेलं झाड आता पुन्हा फांदी तुटल्याने चर्चेत आले आहे. आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू या झाडाच्या ज्या फांदीवर बसली होती. ती फांदी तुटल्यामुळे प्रेक्षकांनी पुन्हा एकदा त्या झाडाजवळ गर्दी केली असून सोशल मीडियावर याची खंत देखील व्यक्त केली जात आहे. ’सैराट झालं जी’ या गाण्यातला काही भाग करमाळ्यातील या झाडावर चित्रित झाला होता. चित्रपटानंतर हे झाड ’सेल्फी पॉईंट’ झाले. या झाडाची ’सैराट झाड’ अशीच ओळख झाली.
ही बातमी आपल्या मुख्यधारेच्या मिडीयात देखील मोठ्या शिताफीने चालविली जातेय, हा महत्वाचा मुद्दा आहे. सोशल मिडीया अशा गोष्टींवर केवळ ’मजा’ म्हणून व्यक्त होत आहे. आणि या माध्यमांवर अंकुश ठेवता येणे हे कठीण काम आहे. मात्र चर्चित वाहिन्या देखील इंटरेस्ट घेत या फांदीचे फिचरवर फिचर तयार करून देताहेत. जस की देशाचं खूप मोठं नुकसान झालय. इथं महत्वाचा प्रश्न उपस्थित होतोय की, खरच न्यूज व्हैल्यू म्हणजे काय? अर्थातच व्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणेच वाहिन्यांचं देखील स्वातंत्र्य आहेच. अर्थात मनोरंजनाच्या दृष्टीने काही वेळ ठीक मात्र बाकीचे महत्वाचे विषय टाळून अशा विषयाला अधिकची व्हैल्यू देणे खरोखर चुकीचे आहे.
फांदी तुटण्याच्या या निमित्ताने नागराज मंजुळे किंवा सिनेमाचा प्रभाव स्पष्ट अधोरेखित होतोय. या प्रसिद्धीत आता कुठच ’जात’ वगेरे मुद्दा दिसून येत नाहीये. त्यावेळी सोशल माध्यमात त्यांच्यावर अतिशय खालच्या दर्जात टीका केल्या गेल्या, अजूनही काहीजण शिव्या देतच आहेत. पण पुन्हा एकदा इथे प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे की, जातीलाच आडवं करण्याचं स्वयंस्फुर्त सामर्थ्य असलेले नागराज आपल्या कलेच्या जोरावर आज शिखरावर आहे याचेच प्रमाण या तुटलेल्या फांदीच्या निमित्ताने होतेय. मात्र ’तुटलेली फांदी’ बातमी व्हावी! असं नागराजलाही कधी वाटत नसेल.
– निलेश झालटे
9822721292