जळगाव। नाशिक येथून जळगावला पळून आलेल्या अल्पवयीन प्रेमीयुगलाला शहर पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्यासोबत असलेली अल्पवयीन मुलीसही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या कुटूंबियांशी पोलिसांनी संपर्क साधत मुला-मुलीबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, शाळेतील मुलं चिडवत असल्याने पळून आल्याचे अल्पवयीन मुलीचे पोलिस चौकशीत म्हणणे होते.
पॅसेंजरने नाशिक येथून निघाले तिघे
नाशिक येथील अकरावीत असलेला 17 वर्षाचा रोहित (बदललेलं नाव) आणि दहावीत शिक्षण घेत असलेली 15 वर्षीय प्रियंका (बदललेलं नाव) या दोघांचे काही अंतरावर घर आहे. यातच रोहितच्या बहिणीची प्रियंका मैत्रीण असल्यामुळे नेहमीच तिची रोहितशी भेट व्हायची. या भेटी-भेटींमध्ये दोघांचे सुत जुळले. मात्र, शाळेत गेल्यानंतर काही विद्यार्थी तिला चिडवायचे. याचा तिला राग येत होता. अखेर शुक्रवारी रोहित आणि प्रियंका हे रेल्वेस्थानकावर आलेत आणि पळून जाण्याचे ठरवले. यासोबत रोहितचा मित्र संदिप (बदललेलं नाव) देखील त्याठिकाणी त्याच्या अल्पवयीन प्रेयसी सोनाली (बदललेलं नाव) सोबत आला आणि चौघांनी पळून जाण्याचे ठरवले. काही वेळानंतर संदिप हा सोनाली हिला सोडून गायब झाला. त्यामुळे ती रडायला लागली. यानंतर रोहित, प्रियंका व तिची मैत्रीण सोनाली यांनी शुक्रवारीच पॅसेंजरमध्ये बसून पळ काढला.
पोलिसांनी तिघांची घातली समजूत
मुली व मुलगा परत न आल्यामुळे त्यांच्या कुटूंबियांनी नाशिक येथे पोलिसात हरविल्याची नोंद केली. यानंतर सर्व पोलिस ठाण्यांमध्ये त्यांची माहिती दिल्यानंतर जळगावातील शहर पोलिस ठाण्याचे प्रितम पाटील व दुष्यंत खैरनार यांना अल्पवयीन प्रेमीयुगल व त्यांची अल्पवयीन मैत्रीण हे जळगाव रेल्वेस्थानकावर असल्याची माहिती मिळताच त्यांनी रेल्वेस्टेशन गाठत तिघांना ताब्यात घेतले. यानंतर पोलिस ठाण्यात तिघांना आणल्यानंतर त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांच्या कुटूंबियांशी संपर्क साधून तिघांबाबत त्यांना माहिती देण्यात आली.