‘सैराट’ झालेल्या पिढीला संस्कारांची गरज : काळजे

0

अधिक महिन्यानिमित्त कीर्तन महोत्सव

पिंपरी : व्यसन, फॅशन आणि इलेक्शन यामुळे समाज मागे पडतोय. आजची पिढी ‘सैराट’ झाली आहे. त्यामुळे पैसा असूनही आई-वडिलांची त्यांना चिंता नाही. त्यासाठी संस्कारांची गरज आहे, असे मत सतीश महाराज काळजे यांनी व्यक्त केले. अधिक महिन्यानिमित्त काळेवाडी येथे विठ्ठलराज भजनी मंडळातर्फे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.काळेवाडीतील ज्योतिबानगर येथील विष्णूराज मंगल कार्यालयाच्या विठ्ठलराज मंदिरात सप्ताहानिमित्त 17 ते 24 मे दरम्यान कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहातील दुसर्‍या दिवसाचे कीर्तन ह.भ.प. काळजे महाराज यांनी सादर केले. यावेळी आयोजक ‘ड’ प्रभाग कार्यालयाचे माजी स्वीकृत सदस्य नवनाथ नढे, नगरसेवक विनोद नढे, सुरेश भोईर, माजी नगरसेवक कैलास थोपटे, बजरंग नढे, सखाराम नखाते, मधुकर काळे, तुकाराम महाराज हापसे, काळुराम काळे, बापूसाहेब ढमाले, गोरख कोकणे, लहू कोकणे, सामाजिक कार्यकर्त्या संगीता कोकणे आदी यावेळी उपस्थित होते

सुख पैशांमध्ये नाही
संत तुकाराम महाराज यांचा लाडकी ‘विषय विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला’ या अभंगाचे निरुपण त्यांनी यावेळी केले. काळजे महाराज म्हणाले की, सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस सुखाच्या शोधासाठी धडपडत आहे. मात्र सुख पैशांत किंवा फॅशनमध्ये नाही. व्यसनांमध्ये तर मुळीच नाही. असे असतानाही अनेकजण त्याच्या आहारी जातात. टीव्ही आणि मोबाईलमुळे आजची पिढी सैराट झाली आहे. अशा तरुणांकडे पैसा असला तरी त्यांना कुटुंब, नातेवाईक, आईवडील यांच्याबाबत प्रेम आणि आपुलकी नसते. त्यामुळे आजच्या पिढीवर संस्कारांची गरज आहे. त्यांचे प्रबोधन झाले पाहिजे.