सैराट नावाचे वादळ पुस्तकाचे नागराज मंजुळेंच्याहस्ते प्रकाशन

0

जळगाव : यावर्षी अख्या महाराष्ट्राला वेड लाऊन येथील सामाजिक, सांस्कृतिक जीवन झपाटून काढणार्‍या सैराट या सिनेमाचा विविध अंगाने मागोवा घेऊन लिहिलेले या सिनेमावरील सर्वात पहिले पुस्तक, ‘सैराट नावाचे वादळ’ चे प्रकाशन या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याहस्ते नुकतेच पुण्यात पार पडले.

जळगाव येथील कॉपीरायटर किशोर सुर्यवंशी यांनी लिहीलेले व अथर्व पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नागराज मंजुळेंच्या उपस्थितीत पुणे येथे उत्साहात पार पडला. सैराट सिनेमाचा समाजमनावरील प्रभाव व त्याची कारणे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन विविध सामाजिक अंगांशी सैराटला जोडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला गेला आहे. खुद्द नागराज मंजुळेंनी दखल घेत या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी वेळ काढुन पुस्तकाचे कौतुक केले. सैराट सिनेमाला विरोध करणार्‍या व समर्थन देणार्‍या वर्गाचा सामाजिक, मानसशास्त्रीय अभ्यास करुन या सिनेमाची विविध अंगाने समीक्षा व चिकित्सा करुन वेगवेगळ्या प्रकरणातून सैराटच्या समाजमनाच्या प्रभावाची कारणे मांडण्यात आली आहेत. सैराटने महाराष्ट्राला याड लावलं, समर्थक विरोधकांचे सैराटवॉर, जातीच्या प्रश्‍नांना छेडणारा सैराट, महिला सक्षमीकरणाचा सैराट, ऑनर किलींग व सैराट, सैराटची पात्रे अन् आपण सैराटपासून बोध काय? यासारख्या विविध दृष्टीकोनातून पुस्तकांत विचार मांडण्यात आले आहेत. सदर पुस्तकाची लोकांमधील उत्सुकता व लोकप्रियता लक्षात घेता लवकरच याचा लोकापर्णण सोहळा जळगावात आयोजित करण्यात येणार आहे. सदर पुस्तक अथर्व पब्लिकेशन जळगाव येथे उपलब्ध आहे. यावेळी पुस्तकाचे लेखक किशोर सुर्यवंशी, अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी, संगिता माळी, टाईम्स ऑफ इंडिया पुण्याचे हेड पत्रकार, कवी टिकम शेखावत आदी उपस्थित होते.