सैलानीला गेलेल्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या घरुन तीन लाखांचा एैवज लांबविला

0

जळगाव- शहरातील समतानगर परिसरातील वंजारीटेकडी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक भागवत ओंकार अहिरे यांचे घर फोडून चोरट्यांनी 2 लाख रुपये रोख व 79 हजाराचे दागिणे असा ऐवज लांबविल्याची घटना मंगळवारी सकाळी समोर आली आहे. अहिरे सर्व कुटुंबियांसह सैलानी येथे गेले होते. मंगळवारी सकाळी परतल्यावर चोरीचा प्रकार समोर आला.
समतानगर येथील वंजारी टेकडी येथे भागवत ओंकार अहिरे हे पत्नी चंद्रभागा, मुलगा अमर, सून काजल या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ट्रान्सपोर्ट नगर येथे अमर ट्रान्सपोर्ट नावाने त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. या कामात त्यांना त्यांचा मुलगा अमर देखील मदत करतो.

सैलानीहून परतल्यावर चोरीचा प्रकार उघड
सोमवारी सकाळी 11.30 वाजता अहिरे हे सर्व कुटुंबियां समवेत स्वतःच्या चारचाकीने बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे दर्शनासाठी गेल होेते. मंगळवारी सकाळी 7 वाजता सैलानीहून जळगावात परतले. घरी पोहचल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश केल्यावर लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त केलेला दिसला. चोरीची खात्री झाल्यावर त्यांनी रामानंदनगर पोलिसांना मोबाईलवरुन प्रकार कळविला. चोरट्यांनी लोखंडी कपाटातील 2 लाख रुपये रोख व चैन, दोन अंगठ्या, लहान मुलाच्या बाह्या, कानातले असे 27 ते 28 ग्रॅम दागिणे असा ऐवज लांबविला.

ट्रकचे टायर तसेच इन्शुरन्सचे होते 2 लाख रुपये
भागवत अहिरे यांना ट्रान्सपोर्ट कामी चालत असलेल्या ट्रकचे चार चाके बदलावयाची होती. तसेच ट्रकच्या इन्शुरन्सचीही मुदत संपली त्यासाठी 40 हजार रुपये लागणार होते. या दोन्ही गोष्टींसाठी अहिरे यांनी 2 लाख रुपये सांभाळून ठेवले होेते. मात्र त्यापूर्वीच चोरट्यांनी डल्ला मारुन रोकड लांबवून नेली. माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सचिन बेंद्रे यांच्यासह कर्मचार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्‍वान पथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.