सॉफ्टवेअर इंजिनिअरची पुण्यात आत्महत्या

0

पुणे : माहिती व तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या कपातीचा धसका घेत, आपल्या नोकरीचा भरवसा नाही या भीतीने अवघ्या चार दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गोपीकृष्ण दुर्गाप्रसाद (वय 25) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. गोपीकृष्णने यापूर्वी दिल्ली, हैदराबाद येथे नोकरी केली होती. चार दिवसांपूर्वीच पुण्यात आला होता. तो दोन दिवस कामाला गेला होता, तो तेथे व्यवस्थित होता. मात्र, बुधवारी त्याने नोकरी जाईल या भितीने आत्महत्या केली आहे, असे विमानतळ पोलिसांनी सांगितले.

मृत्यूपूर्वी लिहिली चिठ्ठी!
गोपीकृष्ण हा मुळचा आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कुभपांडू येथील आहे. त्याला पुण्यात विमाननगर येथील ‘पिटनी बाऊस’ या आयटी कंपनीमध्ये नोकरी लागल्याने तो रविवारी (दि.9) रोजी पुण्यात आला होता. त्याची रहायची व्यवस्था झालेली नसल्याने तो विमाननगर येथील ‘फॉरच्युन हॉटेल’मध्ये रहात होता. सोमवारी व मंगळवारी त्याने कंपनीमध्ये जाऊन काम केले. परंतु, बुधवारी पहाटे चारच्या सुमारास त्याने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. हॉटेलच्या व्यवस्थापकाने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी त्यांच्या रूमची तपासणी केली असता, तेथे त्यांना इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली. आयटी कंपन्यांमध्ये नोकरीची हमी उरलेली नाही, मला माझ्या नोकरीचा भरवसा नाही, मी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. मला भविष्याची व माझ्या कुटुंबाची काळजी वाटत असल्याने आत्महत्या करत आहे. गुड बाय, मला माफ करा, कुटुंबाची काळजी घ्या, असे त्यामध्ये लिहिलेले आढळले. पोलिसांनी याबाबत त्याच्या घरच्यांना कल्पना देऊन ते पुण्यात आल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला.