मुंबई : सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या एका 30 वर्षांच्या तरुणीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी एका बांगलादेशी नागरिकाला सीएसटी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद आयुब सुलेमान असे या 23 वर्षीय बांगलादेशी नागरिकाचे नाव असून त्याच्याविरुद्ध विनयभंगाच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यांचा तपास भुसावळ रेल्वे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. 30 वर्षांची ही तरुणी मूळची बंगलोरची रहिवाशी आहे.
हावरा मेलमधून ती कोलकाता येथून मुंबईत येत होती. तिला मुंबईत तिच्या काही नातेवाईकांकडे महत्त्वाचे काम होते. एसी कोचमध्ये प्रवास करताना तिला रात्री झोप आली. यावेळी तिथेच असलेल्या मोहम्मद आयुबने तिच्याशी झोपेत असताना अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार तिच्या निदर्शनास येताच तिने टीटीईला बोलावून हा प्रकार सांगितला. ही ट्रेन भुसावळ येथे थांबली असता तिने रेल्वे पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मात्र ही ट्रेन तिथे दहा मिनिट थांबणार असल्याने तिने मुंबईत गेल्यानंतर त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत येताच तिने सीएसटी रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी मोहम्मद आयुब सुलेमानला अटक केली होती. चौकशीत तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. हा प्रकार भुसावळ आणि नागपूरदरम्यान झाल्याने त्याचा तपास भुसावळ रेल्वे पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.