भ्रष्ट भ्रष्ट राजकीय नेत्यांची ही मंडळे, त्यांच्या भ्रष्ट पैशांच्या देणग्या, केवळ मनोरंजनासाठी होणारे कार्यक्रम आणि त्यासाठी हजेरी लावणारे संस्कृतीशून्य कलाकार हे चित्र आज आहे. मिरवणुकांमधून दारू ढोसून अचकट, विचकट नाचणारे मंडळांचे युवा कार्यकर्ते, रात्री त्या गणपतीसमोर चालणारे जुगाराचे पत्त्यांचे खेळ…या अशासाठी गणेशोत्सव असतो का?
लोकमान्य टिळकांनी समाजाच्या एकत्रीकरणासाठी सर्व भेद विसरून एकत्र येणार्या समाजाची ताकद निर्माण व्हावी व त्या ताकदीने समाजाला एक विधायक दिशा मिळावी, समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.मात्र, काय दिसते आज या गणेशोत्सवातून? आज त्याच गणपती उत्सवाची व्याख्या बदललेली दिसते, एका गल्लीमध्ये सध्या चार-चार मंडळे दिसतात. त्यामुळे या उत्सवामध्ये संघटन हे उद्दिष्ट दुर्मीळ झाले असून आपापसात मतभेदच अधिक होताना दिसतो.इथे टिळकांचे फक्त नाव घेऊन आपल्या श्रद्धेचा बाजार मांडला जातो. आपण खूप श्रद्धावान म्हणून मनोरंजनाच्या कार्यक्रमाला गणेशोत्सव मानतो. पण यात टिळकांना अभिप्रेत असलेली समाजसुधारणा दिसते कुठे? या उत्सवामधून समाजाचे नक्की कोणते प्रबोधन होत आहे? हे प्रश्न आजही पडतातच. याला काही अपवाद नक्कीच आहेत. पण ती संख्या फार थोडी आहे.
आजचा गणपती उत्सव हा अधिकच हायटेक होताना दिसतो, विविध प्रकारच्या रोषणाई, सजावटींमध्ये अनेक आधुनिकपणा पाहायला मिळतो. पण या सर्व प्रकारामुळे पर्यावरणावर खूपच विपरीत परिणाम होताना दिसत आहे. हल्लीच्या गणपती उत्सवाची सुरुवात ही प्रदूषण या गोष्टीपासून होते व संपतेसुद्धा प्रदूषण याच विषयाजवळ. आपल्या कानाचे परदे फाटतील एवढा कर्कश आवाज गणपती बाप्पांजवळ सुरू असतो. बाप्पांना या गोंगाट्याचं नैवेद्य देणे हे भक्तीचे कोणते रूप आहे. या हायटेक गणपती उत्सवात रात्रीच्या देखाव्यांची वेगळीच मजा असते, पण स्रियांना मात्र बर्याचदा या सगळ्या गोष्टींपासून दूर राहावे लागते. कारण या अशा गर्दीच्या ठिकाणी अनेक वेळा स्त्रियांना नाहक त्रास सहन करावा लागतो. देवदर्शनासाठी आलेल्या स्रियांना विनाकारण धक्काबुकीही केली जाते, हे चित्रण दुर्दैवी आहे. यामुळे नेमकी कोणती दिशा समाजाला या नव्या गणेशोत्सवातून मिळत आहे?
यामुळे गणेशोत्सवाचे आजचे हे भरकटलेले रूप पाहताना तसेच समाज आणि युवक त्यामागे धावताना पाहिले की म्हणावेसे वाटते सॉरी टिळक..! तुम्ही हरलात..! तुमचा गणपती आम्ही केव्हाच विसर्जित केलाय..!!
टिळकांनी सुरू केलेला उत्सव भरकटला…
राज्यभरात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून सगळीकडे गणेशाची विविध रूपे व गणेश मंडळांचा झगमगाट दिसत आहेत.लोकमान्य टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. सामाजिक जागृती, सामाजिक एकात्मता, प्रबोधन, जल्लोष, उत्साह आणि समाजातील सलोख्याचे प्रतीक असलेल्या गणेशोत्सवाची निर्मिती टिळकांनी केली. मात्र, टिळकांनी सुरू केलेल्या या उत्सवाचे भरकटलेले रूपच आज पाहावयास मिळत आहे. लाखो रुपयांचे मंडप आणि रोषणाई, मंडळ चालवणारे ’सु-संस्कारित’(?) नेते, 10 दिवस तारे-तारकांचा झगमगाट, कोणतेही हावभाव नसलेली नाचगाणी, विसर्जनावेळी होणारे कार्यकर्त्यांमधील ’दंडशक्ती’चे प्रदर्शन यात ओथंबणारा भक्तिरस, असे आहे आपले आजचे ’हायटेक’ गणेशोत्सवाचे रूप..!
-स्वप्निल सोनवणे
जळगाव
7507728977